IPL 2026 Auction – चेन्नईने प्रत्येकी 14.20 कोटी मोजून खरेदी केलेले अनकॅप्ड खेळाडू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोण आहे?

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावामध्ये अनकॅप्ड खेळाडू चांगलेच मालामाल झाले. राजस्थानचा विस्फोटक यष्टीरक्षक बॅटर कार्तिक शर्मा आणि अष्टपैलू प्रशांत वीर या दोघांसाठी चेन्नई सुपर किंग्सने अक्षरश: तिजोरी मोकळी केली. चेन्नईने या दोघांवर 28.40 कोटी रुपयांची लयलूट केली. आधी प्रशांत वीर याच्यासाठी 14.20 कोटींची बोली लागली आणि त्यानंतर तासाभरात चेन्नईने कार्तिक शर्मा यालाही 14.20 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये हे दोघेही आता सर्वाधिक बोली लागलेले अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.

प्रशात वीर याची बेस प्राईझ 30 लाख रुपये होती. लखनौ सुपर जायंट्सने बोलीची सुरुवात केली आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सही या रेसमध्ये उतरली. मुंबईने 1.20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. त्यानंतर चेन्नई आणि लखनौमध्ये रस्सीखेच सुरू झाली. बोली 4.20 कोटी गेल्यावर लखनौने माघार घेतली. यानंतर चेन्नई आणि राजस्थान रॉयल्समध्ये टक्कर पाहायला मिळाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही यात उडी घेतली आणि बोली 13 कोटींच्या पार पोहोचली. अखेर चेन्नईने बाजी मारत प्रशांत वीरला 14.20 कोटी रुपये मोजून आपल्याकडे खेचले.

कोण आहे प्रशांत वीर?

प्रशात वीर 20 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि मधल्या फळीत फलंदाजी करतो. तो यंदा पहिल्यांच आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. त्याने आतापर्यंत 12 टी-20 लढतीत 167.16 च्या सरासरीने 112 धावा केल्या आहेत आणि 12 विकेट्सही घेतल्या आहेत. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील रहिवासी आहे.

IPL 2026 Auction – कॅमरून ग्रीन कोलकाताच्या ताफ्यात; 25.20 कोटींची बोली, पण मिळणार फक्त 18 कोटी

कार्तिकसाठी चेन्नई-हैदराबादमध्ये रस्सीखेच

कार्तिक शर्मा हा 19 वर्षाचा असून त्याची बेस प्राईझ 30 लाख रुपये आहे. मुंबईने सुरुवातीला बोली लावली आणि नंतर लखनौ सुपर जायंट्सने यात उडी घेतली. पुढे चेन्नई आणि लखनौमध्ये अखेरपर्यंत कार्तिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. लखनौने बोली 13.20 कोटींपर्यंत नेली, मात्र चेन्नईने हार मानली नाही आणि 14.20 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

कोण आहे कार्तिक शर्मा?

कार्तिक शर्मा राजस्थानचा यष्टीरक्षक बॅटर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने तळाला येत विस्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी लीग स्टेजमध्ये त्याने 5 लढतीत 160 च्या सरासरीने 133 धावा केल्या. 12 टी-20 लढतीत त्याने 160 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपलेल्या आहेत. चेन्नईसाठी गेला हंगाम खास राहिला नाही. त्यामुळे चेन्नईने यंदा कार्तिक आणि प्रशांत सारख्या युवा खेळाडूंवर डाव खेळला आहे.