किल्ले प्रतापगड 364 मशालींच्या प्रकाशाने उजळला, हजारो शिवभक्तांची गडावर हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी 364 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाल़ा हा ‘मशाल महोत्सव’ पाहण्यासाठी व श्री भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी किल्ले प्रतापगडावर गर्दी केली होती. प्रतापगडवासीनी श्री भवानी मातेच्या मंदिरास 364 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाली लावल्या जातात. नवरात्र उत्सवात शष्टीच्या दिवशी राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या ‘मशाल महोत्सवा’चा आनंद लुटला. ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा गड उजळून निघाला.

शुक्रवारी शष्टीच्या दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री 8च्या दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात मशाली प्रज्ज्वलित करण्यात आल्या. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात तसेच भगवे झेंडे फडकावत मशाली पेटवून दीपोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा ‘नयनरम्य’ दृश्य उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवले. किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता.

किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात़ एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने; कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने; कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडावरील या मशाल महोत्सवाचे आयोजन येथील हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर, संतोष जाधव, अभय हवालदार, स्वराज्य ढोल पथक, माय भवानी सामाजिक संस्था, स्वस्तिक ग्रुप डान्सर, पालघर शिवमुद्रांकन प्रतिष्ठान पोलादपूर, प्रतापगड, वाडा कुंभरोशी ग्रामस्थ करीत असतात.