प्राण्यांची हेरगिरी

>> प्रतीक राजूरकर

प्राण्यांच्या हेरगिरीचा इतिहास अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ऋग्वेदात गुप्तहेराचा ‘स्पासा/स्पसा’ नावाने उल्लेख आढळून येतो. इ.स.पूर्व 14 व्या शतकात  इजिप्तच्या इतिहासातील काही दस्तऐवज हेरगिरीची पुष्टी करणारे आहेत. प्राचीन काळापासून असलेली हेरगिरी आधुनिक काळात तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाली असली तरी हेरगिरीची मूळ संकल्पना आजही तितकीच प्रभावी असल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. मानवाप्रमाणेच प्राण्यांचा हेरगिरीसाठीचा वापर आजच्या आधुनिक काळात कालबाह्य झालेला नाही. वास्तविक हेरगिरीसाठी प्राण्यांचा वापर हा तुलनेने अधिक सुलभ आणि उपयुक्त आहे असे म्हणता येईल.

नुकताच ‘हव्लादिमीर’ नामक व्हेल मासा हा स्वीडनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आला आणि जागतिक माध्यमांनी त्याची दखल घेतली. ‘हव्लादिमीर’ हा रशियन गुप्तहेर असल्याचा दावा अनेक अभ्यासकांनी केला आहे. रशियाचे या प्रकरणात असलेले मौनव्रत बोलके असल्याचा अनेकांचा कयास आहे. हव्लादिमीर हा व्हेल मासा पहिल्यांदाच दिसून आलेला नाही, तर याअगोदर 2019 साली नॉर्वेच्या समुद्र किनारी दिसून आला होता. 2019 साली त्याच्या गळ्याभोवती चामडय़ाचा पट्टा आवळून त्यात छुपा कॅमेरा लावण्यात आला होता. कॅमेरा असलेल्या प्लॅस्टिकच्या वेष्टणावर ‘सेंट पीटरबर्ग’ असे अंकित असल्याचा नॉर्वेचा दावा होता. याच कारणास्तव व्हेल माशाचा जन्म कुठेही झाला असला तरी त्याचे बारसे मात्र ‘हव्लादिमीर’ नावाने नॉर्वेकडून झाले आहे.

अनेक तज्ञांनी त्याच्या गतिशील प्रवासाच्या बाबतीत आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण त्याच्या नैसर्गिक अधिवासातून अनपेक्षित गतीने ‘हव्लादिमीर’ बाहेर पडलेला आहे. नॉर्वेतून तीन वर्षांपूर्वी हव्लादिमीरचा प्रवास अत्यंत धीम्या गतीने सुरू होता आणि आता अचानकपणे गेल्या रविवारी तो स्वीडनच्या हद्दीत दिसून आला असल्याचे वृत्त एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमाने प्रकाशित केले आहे. काही अभ्यासकांनी याबाबत शरीरातील नैसर्गिक बदल कारणीभूत असू शकतात, तर काहींनी तो एकाकी पडला असल्याने कदाचित आपल्या प्रजातीच्या शोधात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

प्राण्यांच्या हेरगिरीचे काही प्रसंग 

हेरगिरीसाठी प्राणी, पक्ष्यांचा वापर अनेकदा झाला आहे. कबुतरांनी तर आजवरच्या हेरगिरीच्या इतिहासात 95 टक्के मोहिमा फत्ते केल्याचे प्रकाशित आहे. पहिल्या महायुद्धात तर कबुतरांच्या मानेवर कॅमेरे लावून अथवा संदेश वाहक म्हणून पुरेपूर वापर करण्यात आला. पुढे अनेक वर्षे कबुतरे हेरगिरीच्या क्षेत्रात कार्यरत होती. कदाचित आजही असतील. ‘चेर आमी’ नामक कबुतराला पहिल्या महायुद्धातील सर्वोत्तम कामगिरीसाठी फ्रान्स सरकारकडून मरणोपरांत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. जर्मन सैन्याच्या गोळीने जखमी झालेल्या चेर आमीने दिलेले जबाबदारी पार पाडली आणि जखमी अवस्थेत तो आपल्या तळावर परतला. 194 सैनिकांचे जर्मन सैन्यापासून जीव वाचवणाऱ्या  चेर आमीचे जून 1919 साली निधन झाले.

सर्वच गोपनीय मोहिमांत यश मिळतेच याची खात्री कधीच नसते, परंतु अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडून अनेकदा प्राण्यांचा हेरगिरीसाठी उपयोग करण्यात आला. 1960 साली अत्यंत महागडी गोपनीय मोहीम ‘किट्टी’ सीआयएने सुरू केले, त्यात मांजरांचा वापर करण्यात आला. मांजराच्या गळ्यात रशियाच्या गुप्तहेरांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी उपकरण बसवण्यात आले होते, परंतु एका गाडीच्या धडकेत मोहिमेतील एका मांजराच्या मृत्यूने ही सर्व मोहीम गुंडाळण्यात आली. सीआयएच्या संग्राहालयात कीटक, मांजर, उंदीर, कबुतर यांच्या हेरगिरीसाठी झालेल्या वापराची माहिती उपलब्ध आहे.

2011 साली सौदी अरब आणि सुदानने इस्रायलवर त्यांच्यावर हेरगिरीसाठी गिधाडांचा वापर केल्याचा दावा केला  होता. गिधाडांवर जीपीएस उपकरणे लावून त्यांना सुदान आणि अरब देशात इस्रायलने सोडल्याचा आरोप करण्यात आला होता.

2006 साली एका जग प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाने अमेरिकेकडून शार्क माशांचा वापर समुद्रात आढळून येऊ न शकणाऱ्या बोटींचा छडा लावण्यासाठी केला असल्याचा दावा केला होता. 2010 साली इजिप्तने लाल समुद्रात शार्क माशांकडून होणारे हल्ले इस्रायलकडून केल्या गेल्याचे आरोप केले होते.

2007 साली इराणकडून इस्रायलवर त्यांच्या अणुशक्ती योजनेच्या शोधासाठी सरडे, खारूताईसारख्या प्राण्यांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केल्याचा दावा केलेला आहे.

डॉल्फिनचा वेग, पाण्यातील असामान्य कौशल्याचा वापर अमेरिका आणि रशियाकडून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचा दावा याअगोदर झाला आहे. डॉल्फिनच्या गुणवैशिष्टय़े बघता दोन्ही देशांचे सैन्य डॉल्फिन प्रशिक्षणात अग्रेसर असल्याचे पण प्रकाशित आहे. कॅमेरा, शत्रुसैन्याच्या जलतरण हेरगिरी करणाऱ्या हेरांना स्फोट घडवून संपवणे, समुद्रात खोलवर हेरगिरीसाठी इत्यादी अनेक बाबतीत डॉल्फिनचा उपयोग केला जातो.

अमेरिकेकडून स्थानिक कावळ्यांच्या (रॅवन्स) प्रजातीचा हेरगिरीसाठी प्रशिक्षण आणि उपयोग केला जात असल्याचे, पण प्रकाशित आहे. काही प्रमाणात आपल्या अंगावर सामान कागदपत्रांच्या फायली वाहून नेण्यात स्थानिक कावळ्यांचा अमेरिकेकडून वापर झाला असल्याची काही उदाहरणे आढळतात.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठय़ा प्रमाणात श्वानांचा हेरगिरीसाठी वापर झाला आहे. पॅराशूटने शत्रूच्या सीमेत श्वानांना पाठवून हवा तसा उपयोग केला जातो. प्रामाणिकपणा, शौर्य, वेग ही श्वानांची जमेची बाजू हेरगिरीसाठी प्रामुख्याने उपयोगात आणली जाते.

1943 सालापर्यंत वटवाघळाचा हेरगिरी आणि अंगावर स्फोटके लावून हवे तिथे स्फोट घडवून आणण्यात येत होते. प्रोजेक्ट एक्स-रे म्हणून अमेरिकेच्या एका ‘अँडम’ नामक दंत चिकित्सकाने वटवाघळांचा वापर करण्याचा शोध लावला. जपानवर हजारो वटवाघळांवर छोटे, परंतु प्रभावी नुकसान करतील अशी स्फोटके लावण्याचा उद्योग केला गेला. वटवाघूळ बॉम्बऐवजी अणुबॉम्बचा पर्याय आल्याने कालांतराने वटवाघूळ बॉम्बची एक्स-रे मोहीम बंद करण्यात आली. त्याबाबतीत अनेक मतमतांतरे आहेत. प्राण्यांचा हेरगिरीसाठी वापर होत असला तरी मानवाच्या मेंदूतील ही संकल्पना आजही तितकीच प्रभावी आहे. प्राणी, पक्ष्यांना ना कुठल्या देशाच्या सीमा आहेत ना कुठले नागरिकत्व, परंतु हेरगिरीच्या इतिहासात मानवाइतकेच प्राण्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.