‘साडे नव्याण्णव’वे संमेलन, 100 टक्के यशस्वी झालेलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण दवणे

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझे असेही एक नाटय़संमेलन… नाटककारांचे’ हा कार्यक्रम नुकताच दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात पार पडला. यावेळी 50 हून अधिक नाटककार, मालिका लेखक उपस्थित होते. नाटककारांना सन्मान देणारे संमेलन आगळे ठरले. या मिनी नाटय़संमेलनाबद्दल स्कागताध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केलेल्या भावना…

अशोक मुळ्ये म्हणजे नाटय़क्षेत्रातील एक ‘धक्का’दायक माणूस! त्यांनी फोनवर पहिला धक्का दिला. ‘8 डिसेंबर राखून ठेवा! साडे नव्याण्णवावं नाटककार संमेलन करतोय.’ फोन ठेवल्यावर दोन गोष्टींभोवती मनानं दंगा केला. एक तर केवळ नाटककार, संवाद लेखक यांना केंद्रस्थानी मानून – या पदाचा गौरव करणे, हेच ‘लय भारी’ होतं नि त्यात ‘साडे नव्याण्णव’ही संख्या!

असं अफलातून तडकाबाज ज्यांना सुचतं तेच ‘अशोक मुळ्ये!’ बरं, नुस्तं आमंत्रण नाही…चार-पाच फोनवर आठवण करणार, ‘यायचंच हा दवणे!’ दुपारी तीनला शुभ्र उद्गार चिन्हासारखा पेहराव असणारे अशोक मुळ्ये स्वागताला हजर! सोबत संमेलनाला ‘अर्थपूर्ण’ पाठिंबा देणारे मित्रवर्य रवींद्र आवटींसह ‘दवणे, चहा – कॉफी गरमागरम तयार आहे!’

इथंच साडे नव्याण्णवच्या बहारीला सुरवात झाली. अगदी निवडक निमंत्रित हलके हलके जमत गेले आणि जवळजवळ वर्षभर घराबाहेर न पडलेल्या मनातल्या गप्पांचे फड रंगले. पडद्यावर नट म्हणून लोकप्रिय आणि मालिकांचे संवाद लेखक म्हणूनही खणखणीत अशा चेहऱयांनी दादर – माटुंगा कल्चरल हॉल गजबजला. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, पाच दशके रंगभूमीवर सर्व भूमिकांमधून भरीव काम करणारे अशोक समेळ, आस्वादपर कला जाणिवात्मक लेखन करणारे, कथाकार नि नाटककार गणेश मतकरी, लेखक – दिग्दर्शक – नट अद्वैत दादरकर, उत्तम नाटककार व मालिकांचे संवाद लेखक शेखर ढवळीकर तसेच शिरीष लाटकर अशी नावे संमेलनाचे यश खुणावू लागली.

एखाद्या लग्न घरात वधुपित्याचीही जेवढी लगबग नसेल तेवढी लगबग अशोक मुळ्ये यांची! ‘अरे ते फुगे नीट लाव, पेढय़ांचा बॉक्स कुठे? पुष्पगुच्छ आले का? वाद्यं लगेच लावून घ्या! गाणी भरपूर घ्या! मानधन दिलंय ना? अरे विजय, तू मागे का? चल पुढे; व्वा, सुहास मुद्दाम ठाण्याहून आलीस तू. छान. पण जेवल्याशिवाय जायचं नाही! माझं लक्ष आहे!’ इतकं आपुलकीनं रागावणारा दुसरा माणूस मी तरी पाहिलेला नाही; म्हणूनच भव्य दिव्य मांडवात हरवलेला आत्मीयतेचा स्पर्श मला या ‘माझा नाटककार’ या साडेनव्याण्णवव्या संमेलनात सापडत होता. 77 वर्षे असे स्वतःच जाहीर करणाऱया या माणसाची चपळाई& इतकी अतोनात की पायऱयावरून सारखी येरझार करताना वाटलं, माझेच डोळे दमत आहेत.

‘धक्का’दायक नाटय़ाचा पुढला अंक स्वतः मुळ्येंचंच मनोगत. सच्चेपणा, निखळता, परखडपणा आणि अतिशयोक्तीपूर्ण उपहासाची षट्कारी टोलेबाजी यांचा इतका भन्नाट नमुना दुसरा नसेल! त्या आधीच्या मराठी भावगीत गाण्याच्या कार्यक्रमात श्रीरंग भावे आणि केतकी भावे यांना खुले आम रोमँटिक गाण्याची फर्माइश करताना ‘सर्व कडवी म्हणा, मानधन पूर्ण हवंय ना?’ हे ठणकावणार नि सभागृहात हास्यकल्लोळ होणार हे अनेकदा घडले.

अजून एक रहस्य या भल्या गृहस्थाने दडवले होते. या पहिल्याच असणाऱया केवळ नाटककार संमेलनाचे अध्यक्ष कोण? स्वागताध्यक्ष कोण? दोन्ही खुर्च्या रंगमंचावर मोकळ्याच. हा असा प्रयोग मी पाहिलाच नव्हता.

पण विचारणार तरी कुणाला? जो तो हाच प्रश्न घेऊन एकमेकांकडे बघत असलेला, पण तत्पूर्वीच्या मुक्तसंवादाला नाव तरी काय द्यावं? अशोक मुळ्ये एकाच वेळी बोलत होते नि त्याच वेळी ‘चाललात कुठे? मुख्य कार्यक्रम तर आता आहे’ असं फटकारतही होते. ज्याचं त्याला भरभरून श्रेय देताना उगीच भंपकपणा करणाऱया नामवंतांची मुलाहिजा न ठेवता खरडपट्टी काढत होते. त्यांच्या उपक्रमशिलतेला भरभरून दाद देणाऱयांचे मोठय़ा दिलाने कौतुकही करीत होते, नि सामाजिक करुणेतून निर्माण झालेल्या इतर संमेलनाचे मन भारावून टाकणारे किस्सेही सांगत होते. त्यातले गतिमंद मुलांच्या मातांचे संमेलन हा जगात कुठेही न झालेला अफाट प्रयोग कळला. तर घाटकोपर येथील अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला कृत्रिम हात मिळवून देण्याची कहाणी आणि त्यासाठी कुणाही समोर मदत मागायला हात पुढे करणारे मुळ्येकाका दोन्हीही ‘ग्रेट’ वाटले. एकीकडे सभागृह सातमजली हसत होते; तर त्याच वेळी ते भावनांच्या महासागरात बुडून जात होते.

शब्दांच्या चौकटीत न मावणाऱया या अफलातून अवालियाचं हे साडे नव्याण्णवावं संमेलन म्हणूनच संस्मरणीय ठरलं. आता आणखी एका धक्क्याची वेळ आली होती.

अशोक मुळ्ये म्हणाले, ‘आता या संमेलनाचा ‘माझा’ संमेलनाच्या अध्यक्षांचे मी नाव जाहीर करतो. एक नाटय़पूर्ण स्वल्पविराम घेऊन त्यांनी विख्यात नाटय़ चित्र अभिनेते मोहन जोशी यांचे नाव जाहीर केले. टाळ्यांचा गजर झाला. ‘आता स्वागताध्यक्ष-’ असं म्हणून मुळ्ये थोडं थांबले. आता पुढचा धक्का आणखीनच अनपेक्षित. ‘आजच्या ‘माझा नाटककार’ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत- प्रवीण दवणे!’ सभागृहाला टाळ्यांचा गजर करणे भागच होते. कारण निवड साक्षात अशोक मुळ्ये यांनी स्वतःच्या अधिकारात केली होती.

त्यानंतर लेखक व अभिनेता ऋषिकेश जोशी यांनी नाटककारांच्या सन्मानाचा आग्रह स्पष्ट शब्दात धरला. मानधनापासून इतर रॉयल्टीसंदर्भात जोशी उत्तमच बोलले. शिवाय नाटककारांच्या सन्मानाची व तुडुंब अर्थदानाची परंपरा अतिशय अभ्यासपूर्णरीतीने मांडली. संमेलनाला त्यामुळे एक आशयघन परिमाण आले. विजय केंकरे यांनी संमेलनाचे वेगळेपण अधोरेखित करताना अशोक मुळ्ये यांच्या बोलण्यातील तपशिलांवर खुमासदार भाष्य केले. गणेश मतकरी यांची दोन नवी नाटके आपण दिग्दर्शित करीत आहोत. ही बातमी 2021 ची सुखद झुळुक ठरली. अध्यक्ष मोहन जोशी यांनी अगदी थोडक्यातच मनोगत व्यक्त केले.

कोविडचे भयग्रस्त वातावरण ओसरत असताना सृजनशील लेखण्यांचे असे हाडामांसाचे जिवंत संमेलन भरवण्याची कल्पना सुचणे यातही एक ‘नाटय़’ आहे. अधिकृत की अनधिकृत, नाटय़ परिषदेचे की निर्माता संघाचे, निवडणूक की बिनविरोध अशा कोणत्याही गुंत्यात न अडकता सत्तर एैशी नाटककार मालिका लेखक एकत्र येतात आणि स्वतःला नव्याने शोधू पाहतात. एका नव्या खुल्या जगात जाताना खऱयाखुऱया टाळ्या, खरे हसे आणि ओरखडा न उमटवणारे, ओरखडे उमटवणारे असे नेटके, नेमके संमेलन अपूर्वच ठरले.

दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत रंगत चाललेल्या हिंदी गाण्यांच्या सुरांनी सांगता झालेल्या या एका रंगकर्मी चळवळीमागे वयाने सत्त्याहत्तर, पण वृत्तीने सत्तावीस असं एक मन अखंड वावरत होतं- अशोक मुळ्ये नावाचं!