महापालिकेत बनवाबनवी करणारे ठेकेदार हद्दपार करणार! प्रवीण परदेशी यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

नालेसफाईतील घोटाळा उघड झाल्यानंतर ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळय़ा यादीत टाकले जाते, पण हेच ठेकेदार पुन्हा नाव बदलून शिरकाव करतात. अशा ठेकेदारांना कायमची जरब बसण्यासाठी कठोर कारवाई करायला हवी, असे सांगतानाच केवळ नालेसफाईच नाही तर प्रत्येक खात्यात बनवाबनवी करणाऱ्या ठेकेदाराला हद्दपार करून टाकू, असा इशाराच नवनिर्वाचित महापालिका आयुक्त  प्रवीण परदेशी यांनी दिला. सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पावसाळा तोंडावर आला की संपूर्ण मुंबई ठप्प होते. हे दरवर्षीचेच आहे. गेल्या वर्षी पाणी साचण्याची अडीचशे ठिकाणे होती. यंदा दोनशे नवी ठिकाणे सापडली आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेपुढे मुंबई तुंबण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान आहे. आतापर्यंत 30 ठिकाणची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील. पाणी साचू नये म्हणून ठोस उपाययोजना आणि तत्काळ कार्यवाही केली जाईल. आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी सीसीटीव्ही कॅमेरे कनेक्ट करण्यात आले असून पाण्याचा तत्काळ निचरा कसा होईल याकडे पालिका मुख्यत्वे लक्ष देणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले असून वेळप्रसंगी पाणी साचण्याच्या ठिकाणाचा परिसर पालिका अधिनियमानुसार ताब्यात घेण्यात येईल, असेही परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क आणि सक्षम आहे, परंतु आपत्ती घडल्यानतंर हा विभाग कामाला लागतो. आपत्ती रोखण्यासाठी आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी या यंत्रणेचा योग्य वापर व्हायला हवा, असेही परदेशी यावेळी म्हणाले.

नालेसफाईसाठी जीपीएस ईमेजचा वापर

नालेसफाई चांगल्याप्रकारे होण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या धर्तीवर जीपीएस ईमेज प्रणाली राबवण्यात येईल, असेही परदेशी यांनी यावेळी सांगितले. नालेसफाईच्या कामांत अनेकदा हलगर्जीपणा होतो. गाळ योग्यप्रकारे काढला जात नसल्याने पावसाळ्यात पाणी साचते. परंतु यावर वचक बसवण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येईल, असेही परदेशी म्हणाले.

सरकारी नियमांनुसार अधिकाऱ्यांवर कारवाई

घोटाळ्यांमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे हा सरकारी नियमच असून त्यानुसारच कारवाई व्हायला हवी, असे मत व्यक्त करतानाच मुंबईत अनेक दुर्घटना होतात. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. दोषींवर कारवाई होणारच, परंतु चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सुरू केलेली कार्यपद्धती मी यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे परदेशी यांनी यावेळी सांगितले.

कोस्टल रोडमुळे पर्यावरण, मासेमारीला धोका नाही

कोस्टल रोडमुळे पर्यावरण आणि मासेमारीला कोणताही धोका पोहचणार नाही. मात्र कुणाचा विरोध किंवा शंका असल्यास ती चर्चा करून सोडवली जाईल. रस्ता पूर्ण झाला तर शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटणार असून कोस्टल रोडखाली कोळी बांधवांसाठीही मार्ग ठेवला आहे. त्याबाबत कोळी बांधवांना समजावणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.