कोरोनाची लस आल्याने गाफील राहू नका, नियमावलीचे पालन करा; डॉक्टरांचे आवाहन

कोरोनावरील लस आल्याने कोणीही गाफील राहू नका, दक्षता घ्या आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. पुन्हा कामावर रुजु होण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेल्दी अँन्टीबॉडीची पातळी आणि प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी निरोगी व्यक्तीने दर सहा महिन्यांनंतर स्वतःच्या आरोग्याची स्क्रिनिंग करायला हवी. वृद्ध व्यक्ती आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, मधुमेह, श्वसन रोग आणि कर्करोगासारखे गंभीर व्याधी असणाऱ्या व्यक्तींमध्ये गुंतागुत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही चाचणी गरजेची आहे. कोविड एन्टीजेन तपासणीसारख्या विविध चाचण्यांमुळे कोरोना संसर्ग झाल्याचे निदान लगेच होते. कामावर रुजू व्हायचे असल्यास या चाचण्या कराव्यात. त्यामुळे व्यक्ती तंदुरूस्त असून कामाच्या ठिकाणी इतरांना संक्रमण होणार नाही, हे स्पष्ट होते.

अपोलो डायग्नोस्टिक्सच्या डॉ. प्रेरणा अग्रवाल म्हणाल्या की, अनलॉकनंतर लोकांनी पुन्हा काम सुरू केले आहे. ते प्रवास करीत आहेत त्यासाठी वेळीच तपासणी करून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे गरजेचे ठरते. कोरोनाव्हायरस मुख्यत: फुफ्फुसांवर दुष्परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजारी असते तेव्हा त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. बर्‍याच लोकांना विषाणूमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. अनेक महत्त्वपूर्ण चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या विषाणूचा परिणाम समजून संभाव्या गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

कोविड केअर स्क्रीनिंगमध्ये एटीआय-सार्स-सीओव्ही -2 आयजीजी अँटीबॉडी चाचण्या समाविष्ट केल्या जातात. त्या सामान्य ‘स्वॅब’ प्रकारातील चाचणीपेक्षा वेगळ्या असतात. रक्तातील रक्तपेशी (आरबीसी), पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेट्स (पीएलटी) यासह रक्तातील पेशींचे मूल्यांकन करणाऱ्या रक्त चाचण्या उपलब्ध आहे. फेरीटिन चाचणी शरीरात लोह संचय करणार्‍या प्रथिने फेरीटिनची पातळी मोजते. सी-रिएक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) शरीरात जळजळ होण्याचा त्रास असल्यास करण्यात येते. डी-डायमर चाचणी रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या तपासण्यासाठी किंवा देखरेखीसाठी वापरली जाते. बॅक्टेरियाच्या सेप्सिसचा संशय असल्यास, प्रोकॅलिसिटोनिन (पीसीटी) ही रक्त तपासणी केली जाते. गंभीर संसर्गाचा धोका असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे या चाचण्यांमुळे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.

पूर्वी कोरोनाची लागण झालेल्यांनी आवश्यकतेनुसार चाचण्या कराव्यात. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काळजी घ्या आणि कोरोना नियमावलीचे पालन करा. मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या