
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापुरात सरकारच्या विकासाचे पितळ पुरते उघडे पडले आहे. किन्हवली परिसरातील चाफेवाडी या आदिवासी पाडय़ात एका गर्भवतीला आज भरपावसात झोळीतून दोन किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागला. चिखल तुडवत, नाले पार करत पायपीट करत अॅम्ब्युलन्स गाठावी लागली. ना रस्ता ना वीज अशी बिकट अवस्था चाफेवाडीत आहे.
शहापूर तालुक्यातील नडगावजवळ चाफेवाडी ही 30 घरांची आदिवासी वस्ती आहे. या वस्तीमध्ये चांगला रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. याशिवाय पाणी, वीज, आरोग्य केंद्र यासारख्या प्राथमिक सुविधादेखील नसल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. चाफेवाडीमध्ये राहणाऱया संगीता मुकणे (21) या गर्भवती महिलेला आज दुपारी प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच तिला आकडी आली आणि तोंडातून फेस येऊ लागला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांची धावपळ उडाली.
दुर्दशेला जबाबदार कोण?
राज्य सरकार ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करीत असल्याचा दावा नेहमी केला जातो, पण हा दावा सपशेल फोल ठरला आहे. शहापुरातील आदिवासी महिलेला गावात रस्ता नसल्याने झोळीतून रस्त्यापर्यंत दोन किलोमीटर अंतर कापावे लागले. सध्या संगीता मुकणे हिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. मात्र या दुर्दशेला जबाबदार कोण, असा प्रश्न शहापूरकरांनी केला आहे. या महिलेचा पती रवींद्र हा मोलमजुरी करतो. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून या प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब धास्तावले आहे.
- गावात रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने दोन किलोमीटर अंतरापर्यंत संगीता हिला झोळीत घालून रस्त्यापर्यंत न्यावे लागले. खड्डे, नाले आणि चिखल अशा अडचणींचा डोंगर पार करत कसेबसे रुग्णवाहिकेपर्यंत तिला नेले.
- संगीता मुकणे हिला टाकीपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे याच रुग्णवाहिकेतून तिला शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
- शहापूरच्या रुग्णालयात नेताच संगीताची प्रकृती आणखी खालावली. तोंडातून फेस व चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले असल्याची माहिती आदिवासी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी दिली.