
अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरु होणार असून, ही यात्रा 9 आॅगस्टपर्यंत चालणार आहे. यात्रा सुरु होण्यासाठी अवघा काही काळ शिल्लक राहिल्यामुळे, जम्मूमध्ये आता सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसलेली आहे. जम्मू झोन आयजीपी यांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. रामबनमधील लांबर मैदान आणि राष्ट्रीय महामार्ग परिसराला भेट दिली. अमरनाथ यात्रेच्या सुरू असलेल्या तयारीचा एक भाग म्हणून, जम्मू झोनचे पोलिस महानिरीक्षक भीम सेन तुती यांनी रामबन जिल्ह्यातील लांबर मैदानाची सविस्तर तपासणी केली. अमरनाथ यात्रा मार्गावरील हा एक प्रमुख थांबा आहे.

पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, अमरनाथ यात्रा ही सुरळीत पार पडावी याकरता आता यंत्रणांनी कंबर कसली आहे. तपासणी दरम्यान आयजीपींनी लांबर मैदानावर महत्त्वाच्या नागरी पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. तसेच यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये याकडेही लक्ष देण्यात येत आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेची जबाबदारी, गुप्तचर यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आयजीपींनी राष्ट्रीय महामार्ग परिसराचीही पाहणी केली. यात्रेपूर्वी मार्गाची तयारी सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला.

आढावा तपासणीदरम्यान, डीआयजी शिवकुमार शर्मा यांनी जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील निवास केंद्रे आणि लंगर स्थळांना भेट दिली. कोणत्याही संभाव्य धोक्यांना आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांचे काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी इतर संबंधितांशी समन्वय साधून, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रात ऑपरेशन थर्ड आय राबवण्याचे आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.


























































