
मार्च महिना सुरू झाला की, उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. उन्हाळ्यात घरात बसणेही अवघड होते. घरात एसी हवा असे सर्वांनाच वाटते, परंतु उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाल्यानंतर आता एसी विकणाऱ्या कंपन्यांनी एसीच्या किमती वाढवल्या आहेत. मार्केटमध्ये डायकिन, व्होल्टास, ब्लू स्टार या आघाडीच्या कंपन्यांनी एसीच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
तांबे, ऍल्युमिनियम यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आणि मालवाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने एसीचे दर वाढवावे लागले, अशी कबुली एसी विक्रेत्या कंपन्यांनी दिली आहे. एसी उत्पादक कंपन्यांनी 5 ते 15 टक्क्यांपर्यंत किमतीत वाढ केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपची व्होल्टास, डायकिन, ब्लू स्टार, एलजी, हायर आणि मित्सुबिशी यांसारख्या मोठय़ा ब्रँडचा समावेश आहे. तांब्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. डॉलरमुळे खर्च खूप वाढला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे आयात महाग झाली आहे, त्यामुळे किमती वाढवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. देशात रूम एअर-कंडिशनरची बाजारपेठ वार्षिक जवळपास 1.35 कोटी युनिटस्ची आहे. बाजारात व्होल्टास, एलजी, डायकिन, ब्लू स्टार, हिताची, पॅनासोनिक आणि लॉयड यांसारख्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते.
म्हणून दर वाढवले
कंपन्यांनी एसीचे दर वाढवले आहेत. कारण कॉपर आणि ऍल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाचे दर खूप वाढले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सुटय़ा भागांची आयात महाग झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मालवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेले बीईईचे नवीन ऊर्जा-कार्यक्षमता नियम आदी कारणांमुळे एसीचे दर वाढले आहेत.


























































