शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळगाव

बदली झालेल्या सहकारी शिक्षकाकडून सेवापुस्तकसह कागदपत्रांची फाईल देण्याच्या बदल्यात 5 हजाराची लाच मागताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. यावेळी त्याला मदत करणाऱ्या लिपिकालाही आज अटक करण्यात आली आहे.

येथील पिंप्राळा परिसरात असलेल्या पी.एम.मुंदडा हायस्कुलचे मुख्याध्यापक भरत धुडकु पाटील(57) आणि लिपीक संजय श्रीकृष्ण कुलकर्णी (51) अशी त्यांची नावे आहेत.

मुंदडे विद्यालय जळगाव येथुन लुंकड विद्यालय जळगाव अशी बदली झाल्याने त्यांचे सेवापुस्तक व त्यांचे कागदपत्रांची फाईल देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक व लिपिकाने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पो.नि. निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.