लाइफ गार्ड भरतीमध्ये कोळी बांधवांनाच संधी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील चौपाटय़ांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात येणाऱ्या लाइफ गार्ड भरतीमध्ये स्थानिक कोळी बांधवांनाच प्राधान्य आणि संधी मिळणार आहे. याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. चौपाटय़ांच्या सुरक्षेसाठी ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’ कंपनीकडून ‘गोव्याच्या धर्तीवर’ या लाइफ गार्डची भरती केली जाणार आहे.

मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोका, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाटय़ांवर ही लाइफ गार्डची सुरक्षा पुरवली जाणार आहे. याबाबत प्रशासनाकडून स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. यावेळी शिवसेनेचे रमेश कोरगावकर, मिलिंद वैद्य यांनी प्रस्तावाची अनिवार्यता लक्षात आणून दिली. मुंबईतील वरळी, माहीम, खार, मनोरी, मार्वे अशा चौपाटय़ांवरही सुरक्षा आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीदेखील प्रस्ताव तातडीने मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान-प्रशिक्षण
अग्निशमन दलात दाखल होणाऱ्या या 93 लाइफ गार्डना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चौपाटय़ांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच खासगी संस्थेकडून लाइफ गार्डस्ची भरती केली जाणार आहे. या लाइफ गार्डस्ना आंतरराष्ट्राrय दर्जाच्या इन्स्टिटय़ूटकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.