Ranji Trophy – मुंबईसाठी गुड न्यूज; पृथ्वी शॉ फिट, पश्चिम बंगालविरुद्ध मैदानात उतरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी स्पर्धेवर 41 वेळा विजयी मोहोर उमटवणारा मुंबईचा संघ यंदा जबरदस्त फॉर्मात आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने यंदा 4 पैकी 3 सामन्यात विजय नोंदवला. अर्थात गेल्या लढतीत मुंबईला पराभव पत्करावा लागला. मात्र हा पराभव विसरून मुंबईचा संघ शुक्रवारपासून पश्चिम बंगालशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल. त्याआधी मुंबईसाठी एक चांगली बातमी आली असून विस्फोटक खेळाडू पृथ्वी शॉ याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने फिट घोषित केले आहे.

पृथ्वी शॉ कोलकातामध्ये पश्चिम बंगालविरुद्ध होणारा सामना खेळणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो बऱ्याच काळापासून संघाबाहेर होता. गत 6 महिन्यांपासून तो एकही सामना खेळलेला नाही. ऑगस्ट 2023 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्पटनशायरकडून वन डे सामना खेळताना पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

दुखापत होण्याआधी तो दमदार फॉर्मात होता. त्याने त्याआधी 244 आणि नाबाद 125 धावांच्या खेळीही केल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून लांब रहावे लागले आणि त्यानंतर एनसीएमध्ये दाखल झाला. तिथे त्याने फिटनेसवर काम केले. आता एनसीएने त्याला फिट घोषित केले आहे. त्यामुळे तो पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, एनसीएने त्याला फिट घोषित केले असून तो आता रणजी स्पर्धेत खेळू शकेल. बीसीसीआयने याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएनशलाही दिली आहे. दरम्यान, शॉ सध्या एनसीएमध्ये नेट प्रॅक्टिस करत आहे. लवकरच तो मुंबईकडून खेळताना दिसेल.

पृथ्वी शॉ याने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 5 कसोटी, 6 वन डे आणि 1 टी-20मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.