
सामना ऑनलाईन । राजकोट
पृथ्वी शॉ कसोटी पदार्पणाच्या उंबरठय़ावर उभा आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचा कसोटी क्रिकेटमध्ये श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. या कसोटीच्या दोन दिवसआधी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने पत्रकार परिषदेत सहकारी पृथ्वी शॉला सल्ला देताना म्हटले की, मुंबईच्या या खेळाडूने आपल्या खेळामध्ये बदल करायला नको. मुंबईसाठी जसा खेळतो तसाच खेळ त्याने हिंदुस्थानसाठी करायला हवा. पृथ्वी आक्रमक सलामीचा फलंदाजी असून त्याने यामध्ये बदल करू नये असे अजिंक्य रहाणेला वाटते.
मेहनतीचे फळ
पृथ्वी शॉला अगदी लहानपणापासून बघत आहे. आम्ही एकत्रितपणे सराव केलाय. गेल्या काही महिन्यांत हिंदुस्थान ‘अ’ संघासाठी त्याने मोलाची कामगिरी केलीय. पृथ्वी शॉला मेहनतीचे फळ मिळाले, असे अजिंक्य रहाणे यावेळी म्हणाला.
अंतिम अकरामध्ये कोणाला संधी?
पृथ्वी शॉ याला पहिल्या कसोटीत अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत अजिंक्य रहाणेला विचारले असता तो म्हणाला, टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानात उतरेल याबाबत आताच काही सांगू शकत नाही, पण पृथ्वी शॉला माझ्या शुभेच्छा आहेत. पृथ्वी शॉ असो वा मयांक अग्रवाल प्रत्येकाने संधी मिळाल्यास त्याचे सोने करायला हवे, असे अजिंक्य रहाणेला वाटते.




























































