पृथ्वी महोत्सव – सृजनाचा उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

पृथ्वी थिएटर हिंदी, इंग्रजी प्रायोगिकतेसाठी मुंबईतील भक्कम व्यासपीठ. या प्रायोगिकतेचा उत्सव सध्या सुरू आहे.

रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱया दर्दी रसिकांना उत्तमोत्तम आणि दर्जेदार कलाकृतींचा आनंद घेता यावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पृथ्वी थिएटर महोत्सवा’निमित्त कलेचा बहर फुलणार आहे… नवनवे विषय, कल्पक मांडणी, तरुण रंगकर्मी, हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य शैलीचा मिलाफ यानिमित्त अनुभवायला मिळतो. संगीत, नृत्य आणि नाटय़ या कलांची लयलूट या महोत्सवानिमित्त रसिकांना अनुभवता येते.

कलाप्रेमींसाठी पर्वणी असणारा तसेच मोठय़ा प्रमाणात होणाऱया आणि लोकप्रिय असणारा पृथ्वी थिएटर फेस्टिव्हल रॉयल ऑपेरा हाऊस येथे 11 नोव्हेंबरपर्यंत अकरा दिवस रंगणार आहे. यावर्षीच्या महोत्सवात अंश थिएटर ग्रुप, मॉटली, तांबू, होशरुबा रिपरटरी आणि फॅटस् द आटर्स या समूहांचा विशेष सहभाग असणार आहे.

हिंदुस्थानी कला क्षेत्रातील अनमोल क्षणांचा साक्षीदार असलेल्या पृथ्वी थिएटरमध्ये जगभरातील कलाकार आणि कलाप्रेमीना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. रंगभूमीला त्यातही हिंदी रंगभूमीच्या विकास व विस्तारासाठी प्रयत्नशील राहणे, कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणे, नव्या कलाकारांना, तंत्रज्ञांन आणि संशोधकांना नाटय़कलेतून पुढे येण्याची संधी उपलब्ध करून देणे, तालमीसाठी आणि कार्यशाळा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, नाटय़कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यशाळा घेणे, रंगभूमीसाठी काम करणाऱयांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक आणि आर्थिक मदत देणे ही पृथ्वी थिएटरची उद्दिष्टय़े आहेत.

या अकरा दिवसांत उत्तमोत्तम कलाकृतींचा आनंद महोत्सवानिमित्त रसिकांना घेता येईल. संगीत, नृत्य, नाटय़ अशा कलांची गुंफण असलेल्या महोत्सवात अनेक नव्या कलाकारांना हक्काचं आणि मानाचं व्यासपीठ मिळेलच आणि जुन्या कलाकारांना गतकाळातील वैभवाच्या आठवणीत निश्चितच रमता येईल.

महोत्सवाचे अनोखेपण…
दरवर्षी होणाऱया या अकरा दिवसांच्या महोत्सवात प्रत्येक वेळी काहीना काहीतरी अनोखेपण आणण्याचा प्रयत्न असतोच. यंदाच्या महोत्सवातही संगीत, नृत्य, नाटय़ या कलांना बहर येणार असला तरीही एकूण 22 दिग्दर्शक, 34 लेखक, 155 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग यादरम्यान  होणार आहे. तसेच 60 वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह शो, 3 संगीत मैफिली यांसह नाटक आणि नृत्य मैफिली, 18 कलाकृतींचे प्रोडक्शन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

यंदाची वैशिष्टय़े…
मकरंद देशपांडे, नसरुद्दिन शहा, पीयूष मिश्रा, दानिश हुसेन आणि फॅझेह जलाली या पाच दिग्दर्शकांच्या कलाकृतींचे प्रिमियर प्रोडक्शन पृथ्वी थिएटर आणि रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे.
‘अ डायलॉग बिटविन वर्ल्डस्’ हा आगळावेगळा नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. यामध्ये आधुनिक हिंदुस्थानची कथा सांगितली जाणार आहे. या नृत्याचे दिग्दर्शन मयुरी उपाध्य आणि माधुरी उपाध्य यांनी केले आहे.
पंडित कार्तिक कुमार्स यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त होणाऱया मैफिलीत निलाद्री कुमार आपली कला सादर करणार आहेत. सकाळच्या वेळी आळवल्या जाणाऱया रांगांची ही मैफल रॉयल ऑपेरा हाऊस येथे रंगेल.
रंगभूमीवरील ज्येष्ठांशी चर्चा ‘स्टेज टॉक’ या कार्यक्रमांतर्गत होईल.
पार्टनरशिप्स ‘चाय ऍण्ड व्हाय ?’ हा नाटय़विषय कार्यक्रम सादर होईल.
पाश्चिमात्त्य शास्त्रीय संगीताची अकॉस्टिक मैफल सिम्फोनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडियातर्फे सादर होईल.