खासगी इमारतीत अंगणवाड्यांसाठी मिळणार सहा हजार रुपये भाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात भरीव वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासाठी 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रासाठी 4 हजार तर मुंबईसारख्या महानगर क्षेत्रामध्ये 6 हजार रुपये इतके नवीन भाडे असणार आहे. याविषयी लवकरच शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ऍड. ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. राज्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी 37 हजार 545 अंगणवाड्या या खासगी इमारतीत भरतात. भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जात असल्याने आवश्यक सोयीसुविधांयुक्त इमारती अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध होत नाहीत. ही माहिती मिळताच खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांसाठी भाड्याच्या रकमेत वाढ करण्याचे निर्देश ऍड. ठाकूर यांनी दिले.

यापूर्वी सर्वच क्षेत्रांतील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट 750 रुपये जागाभाडे दिले जात होते. यापुढे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात 250 रुपयांची वाढ करून ते 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रात 3 हजार 250 रुपयांची वाढ करून 4 हजार रुपये तर महानगर क्षेत्रात 5 हजार 250 रुपये अशी भरीव वाढ करून 6 हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.