खासगी बस आणि डंपरचा अपघात, मजुराचा होरपळून मृत्यू

317
प्रातिनिधिक

नेवासा येथे झालेल्या खासगी बस व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना नगर-संभाजी नगर महामार्गावरील प्रवरासंगम येथे रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपरला आग लागली होती.

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कमानीजवळ नगरकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी बस (क्रमांक जी.जे.-14, झेड-8585) डंपरला (विना नंबर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरची डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला. दरम्यान डंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय 27, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हा या अपघातात डंपरमध्येच होरपळून मरण पावला. तर डंपरचालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर खासगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस नाईक बबन तमनर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. मयत पांडुरंग गायकवाड याचा भाऊ शहादेव रामकिसन गायकवाड याने खासगी बस चालकाविरुद्ध नेवासा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या