
कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून जादा बिल आकारणाऱया खासगी रुग्णालयांवर पालिकेची धडक कारवाई सुरूच असून आतापर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना तब्बल 3 कोटी 30 लाखांची रक्कम परत केली आहे. पालिकेकडे जादा बिल आकारण्याबाबत दोन हजार तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी 185 तक्रारी या जादा बिलाबाबत होत्या. या कारवाईमुळे रुग्णांना व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेने या आधी केलेल्या कारवाईत दीड कोटीपर्यंतची रक्कम परत केली होती.
कोरोनाच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून भरमसाट बिल घेतले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी 6 जूनला पाच सनदी अधिकाऱयांची आणि दोघा महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. या अधिकाऱयांकडून आलेल्या तक्रारींची शहानिशा करत खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आकारलेले बिलाचे पैसे कमी करण्यात आले तर काही तक्रारींचे निवारण करत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे परत करण्यात आले. पैसे परत केलेली रक्कम ही 3 कोटी 30 लाख रुपये असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप
कोरोनाच्या रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवासुविधा मिळाव्यात म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या. या 80 टक्के खाटांवर उपचार घेणाऱया रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी केली पाहिजे याबाबत राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी आदेश काढला. या आदेशात आणखी सुधारणा करून सुधारित आदेश 21 मे 2020 रोजी जारी करण्यात आले. या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. असे असले तरी खासगी रुग्णालये भरमसाट आकारणी करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यामुळे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी आणि त्यांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी महापालिकेतील पाच सनदी आणि दोन मुख्य लेखापरीक्षक खात्यातील अधिकाऱयांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांचे नाव आणि ई-मेल जाहीर करण्यात आले.




























































