कुडाळ बसस्थानक बनतेय खासगी वाहनांचे पार्किंग; प्रवाशांना होतोय अडथळा. एस.टी. प्रशासनाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ गांधीचौक येथील बसस्थानकाचा आवार सध्या खासगी वाहनांचे पार्किंग स्थळ बनले आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणात दररोज खासगी वाहने पार्क करून ठेवली जात आहेत. बऱयाचदा ही वाहने प्रवाशी व एस.टी वाहतूकीला त्रासदायक ठरत असतात. बसस्थानक आवारात येणाऱया अथवा आवारातून बाहेर पडणाऱया एस.टी. बसना ही वाहने अडचणीची ठरतात. बसस्थानक आवारात पार्किंग केल्या जाणाऱया खासगी वाहनांची संख्या वाढत असून याकडे एस.टी. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून एस.टी.ची प्रवाशी वाहतूकही लॉक डाऊन झाली. जवळपास तीन महिने पूर्णपणे ठप्प असलेली एस.टी.ची प्रवाशी वाहतूक सेवा अलिकडच्या काही दिवसांपासून 50 टक्के प्रवाशी क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रमुख मार्गांवरच फेऱया सोडल्या जात आहेत. कुडाळ आगारातून कुडाळ सावंतवाडी, कुडाळ – मालवण, कुडाळ सिंधुदुर्गनगरी बसस्थानक, कुडाळ-वेंगुर्ले यांसह परूळे, घोडगे, शिवापूर, कर्ली, बांव आदी प्रमुख मार्गांवर एस.टी च्या फेऱया सुरू आहेत. अनलॉकच्या टप्प्यात प्रवाशांचा एस.टी वाहतूक सेवेला प्रतिसाद मिळू लागला आहे. साहजिक कुडाळ बसस्थानक येथे आता प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. परंतु या बसस्थानकाचा आवार खासगी वाहनांचे पार्किंग स्थळ बनत चालले आहे.

जून्या बसस्थानकाची इमारत पाडून तेथे नवीन सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. जुनी इमारत पाडल्याने बसस्थानकाच्या आवारातील जागा आता मोठी झाली आहे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मुंबईकर चाकरमानीही मोठया प्रमाणात गावी गणेशोत्सवासाठी दाखल झाले असून बऱयाच जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. गणेशोत्सव सणासाठी साहीत्य खरेदीची लगबग सुरू झाल्याने वाहनांसह नागरिकांची रहदारी वाढली आहे. अनेक नागरीक आपापली वाहने गांधीचौक येथील बसस्थानक आवारात पार्क करून खरेदीसाठी बाजारात जात असतात. अगदी गांधीचौक येथे मुख्य ठिकाणीच बसस्थानकाचा परिसर सध्या मोकळा मिळाल्याने खासगी वाहनधारकांना वाहने पार्क करण्यास चांगले ठिकाण मिळाले आहे.