भरारी – अमेरिकेत मायमराठीचा वसा

>> प्रिया कांबळे

कोकणातील जामसूतचे संतोष साळवी हे अमेरिकेतील मराठीजनांमधील लोकप्रिय आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱया साळवी यांनी अमेरिकेतील वसलेल्या पुढच्या पिढय़ांमध्ये मायमराठीचा वसा जागता राहावा यासाठी तिथे सात मराठी शाळा स्थापन केल्या असून अमेरिकेतील मराठी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्हाईट हाऊसमधून निमंत्रण

संतोष साळवी हे अमेरिकेत सात मराठी शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील आपल्या मराठी मुलांवर मराठी भाषेचे, संस्कृतीचे सर्वोत्तम संस्कार व्हावेत यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल अमेरिकन सरकारनेदेखील घेतली. त्यांना सर्वोच्च अशा व्हाईट हाऊसमधून मानाची निमंत्रणे येऊ लागली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले जाऊ लागले. भारतातून अमेरिकेत एम.एस. करायला येणाऱया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या समितीत ते काम करू लागले.

अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डेपॉटिक पक्षाच्यावतीने उमेदवारी लढविलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील संतोष साळवी हे बोस्टनजवळील न्यू हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार झाले आहेत. अमेरिकेचे पहिले मराठी आमदार असलेले संतोष साळवी मराठी शाळा चालवतात. एका मराठी माणसाचे हे यश त्यांचे गावकरी साजरा न करते तरच नवल. अत्यंत कौतुकाने ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.

संतोष साळवी हे फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. या क्षेत्रात काम करत असतान त्यांना अमेरिकेतील करिअरचे पर्याय खुणावू लागले. 1994मध्ये ते अमेरिकेत गेले. पुढे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत झाले. खूप कष्ट करून प्रगतीच्या नवनव्या वाटा शोधू लागले. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने साळवी येथील भारतीय आणि अमेरिकन समाजाशी चांगलेच एकरूप झाले. मात्र याच दरम्यान, त्यांची सॉफ्टवेअर इंजिनीअरची नोकरी गमावली गेली. मात्र खचून न जाता त्यांनी करिअरसंदर्भातील ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट सुरू केली. अमेरिकेत राहून करिअर करीत असताना त्यांनी अमेरिकेतील जे लोक वयाच्या चाळिशीमध्येच योग्य त्या ज्ञानाअभावी नोकरी गमावून बसतात. त्यांना धीराचा हात देऊन आवश्यक ते शिक्षण देऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे काम त्यांनी सुरू केले. नोकरी मिळवण्यायोग्य कसब मिळवून देत हजारो अमेरिकन लोकांचे आयुष्य पुन्हा मार्गस्थ करून दिले. त्यांची संस्था विस्तारत गेली आणि पुढे पुणे, मुंबई, कॅनडा, बहरीन अशा सर्व ठिकाणी त्यांच्या ट्रेनिंग इन्स्टिय़ूटच्या शाखा सुरू झाल्या.

संतोष साळवी पुढे इंडियन असोसिएशनचे प्रेसिडेंट झाले. अमेरकेतील सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर ते काम करू लागले. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँक चालवणे, गरजू रुग्णांना तत्परतेने रक्त पुरवणे, समाजसेवी संघटनेमार्फत गरजूंना मोफत जेवण देणे. हे उपक्रम सातत्याने सुरू असतात. तसेच गेली 20 वर्षे संतोष साळवी करिअर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट चालवत आहेत. त्यामार्फतही ते गरजूंना मोफत मार्गदर्शन करतात. सध्या साळवी बृहन्महाराष्ट्र अमेरिका संस्थेचे खजिनदार असून या संस्थेतर्फे विविध मराठमोळे सांस्कृतिक कार्पाम, उत्सवांचे आयोजन केले जाते.
अमेरिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर ही निवडणूक लढविण्यासाठी संतोष साळवी यांना आग्रह होऊ लागला आणि त्यांनीही निवडणूक लढवण्याचे ठरविले. ज्या धाडसाने आणि निर्भयपणे त्यांनी पाऊल टाकले त्यात हमखास यश मिळणार याची त्यांना खात्री होती. या निवडणुकीतदेखील ते यशस्वी झाले आणि अमेरिकेतील पहिले मराठी आमदार झाले.

संतोष साळवी हे अमेरिकेतील मराठीजनांमधील लोकप्रिय आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या उमद्या स्वभावाला साजेसे असे त्यांचे कार्य आहे. त्यातील महत्त्वाचे कार्य म्हणजे अमेरिकेतील वसलेल्या पुढच्या पिढय़ांमध्ये मायमराठीचा वसा जागता रहावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी अमेरिकेत मराठी शाळा स्थापन केल्या असून अमेरिकेतील मराठी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संतोष साळवी यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच मायमराठीचा डंका जगभर वाजत राहील, यात शंका नाही.
[email protected]