ट्रेनी ते सीईओ… प्रिया नायर यांची उत्तुंग भरारी! 92 वर्षांत प्रथमच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत महिलाराज

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) च्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली. प्रिया नायर असे त्यांचे नाव आहे. त्या 1 ऑगस्ट 2025 ला पदभार स्वीकारणार आहेत. प्रिया नायर या एचयूएलच्या 92 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला  सीईओ ठरल्या आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. हा निर्णय देशातील कॉर्पोरेट जगतात लिंग समानतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ट्रेनी ते सीईओ असा त्यांचा नेत्रदीपक प्रवास आहे.

प्रिया नायर सध्या युनिलिव्हरमध्ये ब्युटी अँड वेलबिंग विभागाच्या अध्यक्षा आहेत, जो कंपनीचा वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. त्या रोहित जावा यांची जागा घेतील, जे 31 जुलै 2025 रोजी निवृत्त होत आहेत. प्रिया नायर यांनी 1995 मध्ये एचयूएलमध्ये एंट्री केली होती. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. प्रिया यांनी सिडनहॅम कॉलेजमधून कॉमर्स आणि सिम्बायोसिसमधून मार्पेटिंगमध्ये एमबीए केले आहे.

कंपनीचे शेअर्स वधारले

प्रिया नायर यांच्या नियुक्तीनंतर हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स  शुक्रवारी चांगले वधारले. कंपनीच्या शेअरमध्ये  4.60 टक्के वाढ होऊन 2519 रुपयांवर ट्रेड करत होता.