Operation Sindoor Debate – डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असे थेट सांगा, प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामवर लोकसभेत झालेल्या चर्चेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री दोघांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री दोघेही सत्य बोलायला टाळाटाळ करत आहेत, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत हे पंतप्रधानांनी सरळ सरळ सांगावे, असे आव्हान प्रियांका गांधी यांनी दिले.

काँग्रेसकडून सातत्याने आरोप होत असतानाच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत आज चर्चेला उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामवर कोणत्याही तिसऱ्या पक्षाकडून मध्यस्थी करण्यात आली नव्हती. हा प्रश्नच उद्भवत नाही, हे देखील जयशंकर यांनी स्पष्ट केल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. संसदेच्या आवारात बुधवारी प्रियांका गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐकल्यास त्यांनी गोलमाल उत्तर दिले आहे, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.