मोदी भाषणात अर्ध्याहून अधिक वेळ गांधी, नेहरू कुटुंबावर टीका करतात!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्याहून अधिक वेळ गांधी आणि नेहरू कुटुंबीयांवर टीका करण्यात घालवतात. परंतु गेल्या पाच वर्षांत काय केले हे त्यांच्या भाषणातून सांगत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये काँग्रेसची जाहीर प्रचारसभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. मोदींच्या 50 टक्के भाषणात इंदिरा गांधी यांनी हे केले, जवाहरलाल नेहरू यांनी ते केले याबाबतच असते. पण गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने काय केले, त्याबद्दल काहीच नाही सांगत असा हल्लाबोल त्यांनी केला. दरम्यान, वाराणसी या मतदारसंघातून मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तसे संकेतही दिले आहेत, मात्र त्यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.