कॉँग्रेसला बळ देण्यासाठी प्रियांका गांधी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात! अमेठी किंवा रायबरेलीमधून लढणार

priyanka-gandhi-up

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्य़ा विधानसभा निवडणुकीची कॉँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसला बळ देण्यासाठी पक्षाच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. त्या अमेठी किंवा रायबरेलीमधील एका मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी लखनऊ येथे सल्लागार समितीची एक बैठक झाली. या बैठकीत प्रियांका गांधी यांना त्या स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नवी ताकद मिळेल, असे सांगण्यात आले. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही प्रियांका यांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत गांधी कुटुंबातील सदस्यांनी फक्त लोकसभा निवडणूक लढवली आहे. प्रियांका यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास त्या गांधी कुटुंबातील पहिल्या सदस्य असतील. सुत्रांचे म्हणणे आहे की, प्रियांका यांची पहिली पसंती अमेठी आहे, कारण त्यांना राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

कॉँग्रेसकडून सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी

प्रियांका गांधी यांनी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात  उतरणार किंवा नाही याबद्दल अद्याप कोणतेही संकेत दिले नाहीत, परंतु प्रियांका यांच्या कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यांच्यासाठी  रायबरेली आणि अमेठीमधील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असून  डेटा गोळा केला जात आहे.

अमेठी किंवा रायबरेली का?

रायबरेली आणि अमेठी हे वर्षानुवर्षे गांधी घराण्याचे गड आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या पराभवानंतर गांधी कुटुंबाचे वर्चस्व कमी झाल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रायबरेलीतील गांधी परिवाराचा जनतेशी असलेला संपर्कही कमी झाला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रियांका गांधी अमेठी किंवा रायबरेलीमधून विधानसभा लढवण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या