
”लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी यांनी जो काही दावा सभागृहात केला तो साफ खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेयत व ते अध्यक्षांच्या मागे लपून बसलेयत”, अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केली आहे.
लोकसभेत काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या बाकाजवळ गेल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगिती केलं. त्यानंतर गुरुवारी सकाळी अध्यक्षांनी पंतप्रधानांचे भाषण रद्द केले असून बुधवारी पंतप्रधानांसोबत सभागृहात काही अघटित घडू शकले असते म्हणून आपणच त्यांना सभागृहात येऊ नका असे सांगितल्याचा दावा ओम बिर्ला यांनीा केला.
लोकसभा अध्यक्षांकडून काँग्रेसवर करण्यात आलेल्या आरोपांना प्रियांका गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ”काय घडलं काल सभागृहात. महिला खासदार तिथे उभ्या होत्या त्यात काय झालं. जे काही बोललं जातंय ते साफ खोटं आहे. पंतप्रधानांवर हात उचलण्याचा, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रश्नच नव्हता. असा काही प्लॅन होता असे म्हणने अत्यंत चुकीचे आहे. पण जर तुमच्या सदस्यांना काहीही चुकीचं बोलायची परवानगी देता तर विरोधक त्याचा विरोध करणारच. पंतप्रधान आता लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून बसले आहेत. ते सांगतात तीन महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ आलेल्या. खरंतर पंतप्रधानांमध्ये हिंमत नव्हती सभागृहात यायची, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.



























































