
गांधी कुटुंबामध्ये नवीन सदस्यांची एन्ट्री होणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि केरळच्या वायनाड मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी व रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. रेहानच्या साखरपुड्याची चर्चा सुरू असून प्रेयसी अविवा बेग हिच्यासोबत तो लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
रेहान वाड्रा आणि अविवा बेग गेल्या 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकतेच रेहानने अविवा हिला लग्नासाठी मागणी घातली आणि तिनेही होकार दिला. एवढेच नाही तर दोन्ही कुटुंबियांनीही या लग्नाला संमती दिली आहे. नववर्षात राजस्थानमधील रणथंभौर येथे दोघांचा साखरपुडा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप यावर दोन्ही कुटुंबियांकडून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
कोण आहे रेहान वाड्रा?
रेहान हा प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मोठा मुलगा आहे. 29 ऑगस्ट, 2000 मध्ये त्याचा जन्म झाला. तो 25 वर्षांचा असून राजकीय झगमगाटापासून दूर राहत आला आहे. त्याने दिल्ली आणि डेहराडूनमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि लंडनमधील विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. तो एक व्हिज्युअल आणि इन्स्टॉलेशन आर्टिस्ट आहेत. त्याला ट्रॅव्हल आणि नेचर फोटोग्राफीची विशेष आवड आहे.
अविवा बेग कोण आहे?
अविवा बेग या दिल्लीतील प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. तिच्या फोटोग्राफीमध्ये दैनंदिन जीवनातील साधेपणा आणि गुंतागुंत यांचे प्रतिबिंब दिसते. गेल्या 5 वर्षांत तिने ‘इंडिया आर्ट फेअर’ आणि ‘मेथड गॅलरी’ सारख्या मोठ्या व्यासपीठांवर आपली कला सादर केली आहे. ‘अँटलेयर 11’ (Atelier 11) या फोटोग्राफी स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनीची ती सह-संस्थापक आहे. देशातील अनेक नामांकित ब्रँड्ससोबत ती काम करते.




























































