डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या,पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवतेला काळिमा फासणारी घटना हैदराबादमध्ये घडली. एका 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टर महिलेवर चार जणांनी रात्रभर बलात्कार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह घटनास्थळापासून 30 किलोमीटर अंतरावर नेऊन पेट्रोल ओतून पेटवून दिला. या घटनेमुळे हैदराबादमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून चारही आरोपींना साईबराबाद पोलिसांनी अटक केली. यात एक ट्रकचालक आणि क्लीनरचा समावेश आहे. या चारही जणांनी दारू ढोसली होती.

एका वेटरनरी हॉस्पिटलमध्ये ही महिला नोकरी करत होती. हैदराबाद-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तोंडुपल्ली टोल प्लाजाजवळ ती आपली टू व्हीलर पार्क करून कॅबमधून हॉस्पिटलपर्यंत जात होती. दरम्यान, एका शेतकऱ्याने डॉक्टर महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पाहिला. याबाबत त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारावर कुटुंबीयांना घटनास्थळावर बोलावले. तिचा अर्धवट जळालेला स्कार्फ आणि गोल्ड पेंडेंटच्या साहय़ाने मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

नेमके काय घडले
बुधवारी रात्री साडेनऊ वाजता या डॉक्टरने आपल्या बहिणीला फोन करून आपली टू व्हीलर पंक्चर झाल्याचे सांगितले. तसेच एक व्यक्ती तिला मदत करत असल्याचे सांगितले. त्यानंतर थोडय़ा वेळाने पुन्हा तिचा फोन आला आणि संबंधित व्यक्तीने येथील सर्व दुकाने बंद झाली असून पंक्चर काढण्यासाठी टू व्हीलर दुसरीकडे घेऊन जावी लागेल असे सांगितले अशी माहिती संबंधित डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

पंक्चर काढण्याच्या बहाण्याने घेऊन गेले
टू व्हीलरचे पंक्चर काढून देण्याच्या बहाण्याने चौघे डॉक्टर महिलेला आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर रात्रभर बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून 30 किलोमीटर अंतरावर पुलाखाली नेऊन पेट्रोल ओतून पेटवून दिला. चारपैकी दोन आरोपी बाईकवर होते तर दोन आरोपी ट्रकमधून टोल प्लाझावर परतले. यातील एकजण नारायणपेटमध्ये राहणारा असून तो मुख्य आरोपी आहे. अहमद पाशा असे त्याचे नाव आहे.

तिने 100 क्रमांकावर फोन करायला हवा होता
सुशिक्षित असूनही तिने 100 क्रमांकावर फोन करण्याऐवजी आपल्या बहिणीला फोन केला. तिने जर 100 क्रमांकावर फोन केला असता तर ती सुरक्षित राहिली असती. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याची गरज असून या क्रमांकावर फोन करताच पोलीस तीन मिनिटांत घटनास्थळी पोहचले असते असा दावा तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांनी केला.

प्रचंड दहशतीखाली होती डॉक्टर महिला
रात्रीची वेळ असल्याने डॉक्टर महिला प्रचंड घाबरली होती. टोल प्लाझा या ठिकाणी कुणाची तरी मदत मिळेल या आशेने ती उभी होती. बहिणीने तिला टू व्हीलर तिथेच सोडून कॅब करून घरी येण्यास सांगितले. आजूबाजूला अनोळखी लोक असून ते तिच्याकडे एकटक पाहत असून आपल्याला प्रचंड भीती वाटत असल्याचे तिने बहिणीला सांगितले. डॉक्टरने बहिणीला फोनवर बोलत राहण्यास सांगितले. रात्री पावणेदहाच्या सुमारास डॉक्टरचा फोन स्वीच ऑफ झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात महिला डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.