
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यंदा पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत दहीहंडी उत्सावाची जोरदार तयारी दिसून येत आहे. यानिमित्त शहरातील विविध मंडळांच्या दहीहंडीला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सिने तारे-तारका, रील स्टार हजेरी लावणार असून, लाखोंचे ‘लोणी’ गोविंदा चाखणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी यांसह विविध भागांत मोठ्या उत्साहात शनिवारी (१६ रोजी) गोपाळकाला साजरा करण्यात येणार आहे.
मोहननगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि विशाल यादव युवा मंचच्या वतीने ‘भगवा दहीहंडी महोत्सव’चे आयोजन केले आहे. लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुका काही महिन्यांतच होण्याची शक्यता आहे. निवडणूक इच्छुकांसाठी असे सण-उत्सव म्हणजे नागरिकांसमोर झळकण्याची एक संधी! त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे. चार दिवस आधीपासूनच शहरातील चौकाचौकांमध्ये दहीहंडी उत्सवाचे फ्लेक्स लागले आहेत. काही ठिकाणी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैठणी आणि विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हेही मागील काही वर्षे दहीहंडीचे आकर्षण ठरले आहे. मंडळांकडून लाखो रुपये या सिने तारे-तारकांसाठी मोजले जाणार आहेत. दहीहंडी स्टेजवर बोलाविण्याचे, कला सादर करण्याचेही पैसे आकारले जातात. यंदाही अनेक तारे-तारका वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत. त्यात आता रील स्टार्सचीही भर पडली आहे. शिवानी सुर्वे, अक्षरा देवधर यांच्यापासून ते रील स्टार्सपर्यंत अनेक जण शनिवारी दंहीहंडी उत्सवासाठी उपस्थित असणार आहेत.
अनेक गोविंदा पथकांची हजेरी
भोसरी-इंद्रायणीनगर येथील ‘इंद्रायणी युवा प्रतिष्ठान’द्वारे श्याम आगरवाल क्रिकेट मैदानावर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या दहीहंडीला अभिनेत्री त्रिधा चौधरी, जिया शंकर, स्वाती बाल्टे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष तुषार सहाणे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानद्वारे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत सामाजिक बांधिलकी साधण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सहाणे यांनी सांगितले.