
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील रुग्णालयातील विविध समस्या लवकरच दूर होणार आहेत. त्याचबरोबर येथील लसीकरण पेंद्रात नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयिस्कर करण्याचे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी आणि खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतीच मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वरील माहिती दिली. तत्पूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष नंदू राणे, उपाध्यक्ष संजय बांदिवडेकर, राजेश दुबे, चिटणीस सुनील नेवरेकर आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुराई यांची भेट घेत राहुल शेवाळे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.
दरम्यान, नजीकच्या काळात इतर काही रुग्णालयांत घडलेल्या घटना लक्षात घेता वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे फायर ऑडिट करुन घेणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे, त्याची देखभाल करणे, रेमडीसीविर तसेच इतर जीवरक्षक औषधे यांचा पुरवठा, व्हेटिलेंटर बेड व्यवस्था, कोविड वॉर्डमधील सोयी सुविधा, रुग्णांकरिता बनविण्यात येणाऱया जेवणाकरिता असलेले असुरक्षित स्वयंपाकगृह आदी समस्यांवर चर्चा करून कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती, ज्याला पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांनी दिली.

























































