
सामना प्रतिनिधी । नांदेड
वृत्तपत्र विक्रेता हा समाजाचा एक अविभाज्य घटक असून, त्याच्या कल्याणासाठी सर्वस्तरातील मंडळींनी झटले पाहिजे, कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी सरकारचा उशीर कशासाठी, असा सवाल करुन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सोमवारी येथे दिले.
माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड येथे वृत्तपत्र विक्रेता दिन आणि विभागीय स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार डी.पी.सावंत, महापौर शीला भवरे, संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, वर्धा, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, दै.सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, शंतनू डोईफोडे, प्रदीप नागापूरकर, माने, राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष बालाजी पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुंबईतील डब्बेवाल्यांच्या नियोजनाचे कौतूक करताना हे डब्बेवाले किती शिस्तबध्दपणे काम करतात, त्यांचे कौतूक हे सबंध जगात झाले आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता देखील समाजाचा महत्वाचा घटक असून, त्यांचे काम भल्या पहाटे सुरु होते. एखाद्यावेळी वर्तमानपत्र उशिर आले तर आपल्याला करमत नाही, ते लवकर मिळावे यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाटे चार वाजल्यापासून धडपड सुरु असते. या विक्रेत्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. नांदेड पातळीवर असलेले वृत्तपत्र स्टॉल व टिनशेडचा प्रश्न येत्या काही महिन्यातच मार्गी लावू तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना घरकूल योजनेत समाविष्ट करुन घेण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्ष बालाजी पवार यांनी आपल्या भाषणात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, राज्यभर वृत्तपत्र विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करुन असंघटीत कामगार म्हणून नोंदणी सुरु करावी, तसेच या वर्गाला चांगल्या पध्दतीने संरक्षण देवून त्यांच्या घरकुलांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सायकल स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते तसेच पत्रकार प्रदीप नागापूरकर, रुपेश पाडमूख, करणसिंह बैस, जगन्नाथ व्यवहारे व महिला वृत्तपत्र विक्रेत्या वंदना लोणे यांचाही गौरव करण्यात आला. तत्पूर्वी चैत्राली चंद्रकांत घाटोळ या युवतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या समस्या मांडून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्वाचा आहे, अशी भावना व्यक्त केली. तर सृष्टी कटकमवार या बालिकेने आपल्या भाषणातून विक्रेत्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी पवार, गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ, अवधूत सावळे यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन निवेदक देवदत्त साने यांनी केले.


























































