
>> वसंत चव्हाण
मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत येथील नव्या खाडीपुलाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असून त्यामुळे ट्रॅफिककोंडीचा जांगडगुत्ता सुटणार आहे. सध्या या खाडीपुलावर 35 टनांचे तब्बल 31 डंपर उभे करून ‘लोड टेस्टिंग’ करण्यात येत आहे. टेस्टिंग यशस्वी होताच नव्या खाडीपुलाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मुंबई-नाशिक प्रवास आरामदायी व सुसाट होणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले जात होते. साकेत पूल हा ठाणे खाडीवर उभा असून जुन्या पुलावर वाहनांना ये-जा करण्यासाठी सध्या केवळ दोन मार्गिका उपलब्ध आहेत. या अरुंद मार्गांमुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता या महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले. नव्या खाडीपुलाचे काम तब्बल अडीच वर्षे धीम्या गतीने सुरू होते त्यामुळे रोज या पुलावर प्रचंड वाहतूककोंडी असायची. आता मात्र वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नव्या पुलाचे काम पूर्ण झाल्याने ठाण्याहून नाशिक, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर येथे वाहतूक करण्यासाठी नव्या साकेत पुलाचा वापर होईल.
नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडी येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी जुन्या साकेत पुलाचा वापर केला जाणार आहे.
बॅलन्स कॅन्टीलिव्हर टेक्नॉलॉजी पद्धत वापरून पूल बांधण्यात आला आहे. तीन खांबांवर पूल उभा केला असून जवळपास १०० वर्षे पूल टिकेल. २०० मीटर लांबीचा चार पदरी पूल तयार करण्यात आला आहे.
– सुभाष बोरसे, अधिकारी, एमएसआरडीसी






























































