संजू बाबाची निर्मिती असलेला बाबा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

88

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता संजय दत्तची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. नुकतेच संजय दत्तच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  मुकबधीर दाम्पत्याच्या आपल्या मुकबधीर लेकरासाठीचा लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा वाढवणारा आहे.

बाबा ‘सिनेमाच्या टीझरमुळे उत्सुकता वाढल्यानंतर संजय दत्तने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘तनू वेड्स मनू’ फेम बॉलिवूड अभिनेता दीपक डोब्रियाल ‘बाबा’ मध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर त्याच्या मुलाच्या भूमिकेत आर्यन मेघजी हा बाल कलाकार दिसेल.

बापलेकाच्या जोडीचं अनोखं नातं या चित्रपटात पाहायला मिळेल. दीपकच्या पत्नीच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री नंदिता धुरी दिसणार आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मूकबधीर दाम्पत्याचं मूकबधीर लेकरु. अचानक एका महिलेने हे मूल आपलं असल्याचा केलेला दावा. त्यानंतर ढवळून निघालेलं त्यांचं भावविश्व, असं या सिनेमाचं कथानक असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतयं. 2 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या