
गार वाऱ्याचा आस्वाद घेत बंदिशी, राग, भावगीतं, भक्तिगीतं असे अनेक गीतप्रकार ‘गानमहोत्सवा’च्या माध्यमातून रसिकांसाठी सध्या होत आहेत.
सध्याचे दिवस हे उबदार थंडीचे… अशा या आल्हाददायक वातावरणाचा आनंद गाण्यांच्या साथीनं अनुभवण्याची मजा काही वेगळीच…रसिकांच्या मनाला मोहवणाऱ्या मैफली, बैठका, महोत्सव या दिवसांत मोठ्या प्रमाणात होतात…नुकताच सवाई गंधर्व संगीत महोत्सवही पार पडला… गार वाऱ्याचा आस्वाद घेत बंदिशी, राग, भावगीतं, भक्तिगीतं असे अनेक गीतप्रकार ‘गानमहोत्सवा’च्या माध्यमातून रसिकांसाठी सध्या होत आहेत.
महोत्सवात होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमांबाबत ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर सांगतात, मोठ्या उत्सवांचे कार्यक्रम हिवाळ्यातल्या थंड वातावरणात साजरे होतात. या महोत्सवांचं वैशिष्टय़ म्हणजे, यामध्ये अनेक कलाकार आपली कला रसिकांसमोर पेश करतात. त्यांच्या कलेतील विविधतेचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो. लोकांकडेही सध्या वेळ कमी असल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी अनेक कलाकारांच्या कलेचा दृकश्राव्य आनंद घेता येतो, हे या महोत्सवांचं वैशिष्टय़.
संगीत महोत्सवात भरपूर प्रेक्षक असतात. त्यामुळे कलेच्या माध्यमातून रसिकांशी एकरूप होणं हे वादकापुढे मोठं आव्हान असतं. तरीही संगीतात एवढी ताकद आहे की, ते एवढ्या लोकांच्या हृदयाशी भिडतंच, असं नुकत्याच झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवात व्हायोलिन वादन केलेला 18 वर्षीय यज्ञेश वायकर सांगतो.
महोत्सवाचं स्वरूप व्यापक…
मैफली, बैठकींचं स्वरूप आता व्यापक होतंय. मोठ्या संख्येने आता कार्यक्रमांना प्रेक्षकांची हजेरी असते. स्वरूप लहान-मोठं कसंही असलं तरी लोकांना आनंद मिळणं महत्त्वाचं. त्यामुळे आता अशा संगीतविषयक कार्यक्रमांना उत्सवाचं रूप येऊ लागलंय. तरीही तिकीट असलेल्या कार्यक्रमांनाही भरपूर प्रतिसाद मिळायला हवा, असं शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांचं म्हणणं आहे.
संगीतविषयक कार्यक्रम
- संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोह, राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे, 20 डिसेंबर, रात्री साडेआठ वाजता ‘त्रिनाद’.
- शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम. माणिक सभागृह, वांद्रे रेक्लमेशन, वांद्रे (प.) 22 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता.
- हिंदी चित्रपटांतील अजरामर गीतांमधील विविध वाद्ये आणि त्यांचा उत्कंठावर्धक इतिहास उलगडणारी अद्भुत वाद्य मैफल ‘सूर ओ साज की बाते’. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे या मैफलीत निवेदन करणार आहेत. रविवार, 23 डिसेंबर, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले रात्रौ 8.30 वा.
- पंचम निषाद प्रस्तुत 99व्या प्रातःस्वर या सकाळच्या रागांच्या मैफलीत प्रसिद्ध गायक प्रभाकर कारेकर यांचे ख्याल गायन. 23 डिसेंबर सकाळी 6.30 वाजता. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी.
- स्वरयात्रातर्फे अविस्मरणीय गाणी आणि आठवणीतले किस्से. 31 डिसेंबर रोजी रात्रौ 8.30 वाजता, मास्टर दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
- ह्रदयेश आर्टस् प्रस्तुत 11 ते 13 जानेवारीदरम्यान पार्ले टिळक विद्यालय प्रांगण, विलेपार्ले (पूर्व) सायंकाळी 5.30 वाजता पं. विजय घाटे, राहुल देशपांडे यांचे गायन.





























































