
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील विविध विकासकामे आणि प्रकल्पांमध्ये घरे जाणाऱया प्रकल्पग्रस्तांना 75 टक्के आर्थिक मोबदला मिळणार असून संबंधित विभागातील रेडीरेकनरनुसार हा मोबदला मिळणार आहे. यामध्ये 100 चौरस फुटांसाठी 9 ते 23 लाखांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार असून 1962 पूर्वीची घरे आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी 100 टक्के मोबदला मिळणार आहे.
मुंबईत होणारे विविध प्रकल्प, नाले, रस्तेरुंदीकरणात अनेक झोपडय़ा-गाळे हटवले जातात. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर, गाळ्याच्या बदल्यात गाळा दिला जात असे. मात्र अनेक प्रकल्पांमध्ये पुनर्वसितांना मिळणारी घरे ही मुंबईपासून लांब किंवा पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसणाऱया ठिकाणी दिली जात असल्यामुळे रहिवासी तिथे जाण्यास तयार होत नव्हते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना त्या त्या विभागातील रेडीरेकनरनुसार आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
…म्हणूनच घेतला निर्णय
आगामी काळात मुंबईत वाढत जाणारी विकासकामे, प्रकल्प यामुळे व्यावसायिक जागांची तूटही वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही वाढत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे आगामी काळात विकासकामे-प्रकल्पही मार्गी लागणार असून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
अशी आहे सद्यस्थिती..
पालिकेच्या बाजार विभागाने आतापर्यंत सुमारे 2,88,887 चौरस फूट जागांचे वितरण व्यावसायिक प्रकल्पबाधितांना केले आहे.
यामध्ये आणखी सुमारे 8,670 चौरस फूट क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. मात्र आता आणखी व्यावसायिक प्रकल्पबाधित असून त्यांची संख्या सुमारे 1,574 इतकी असून त्याकरिता सुमारे 2,83,320 चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता आहे.
यात गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 300 आणि तानसा जलवाहिनीसाठी 1094 प्रकल्पबाधित आहेत.




























































