‘तौकते’ चक्रीवादळात 2364 झाडे-फांद्या कोसळल्या; मुंबईतील धोकादायक झाडांच्या छाटणीसाठी 38 कोटींचे प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या तोडण्याच्या 38 कोटींच्या तीन प्रस्तावांना आज वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली. ‘तौकते’ चक्रीवादळात तब्बल 2364 झाडे-झाडाच्या फांद्या कोसळल्या आहेत.

मुंबईतील धोकादायक झाडे, झाडाच्या फांद्या आणि मृत झाडे हटवण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जाते. तर खासगी आवारातील धोकादायक झाडे-फांद्या पालिकेच्या परवानगीने संबंधितांना हटवता येतात. अतिवृष्टीमुळे झाडे कोसळून होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी पावसाळ्याआधी ही कार्यवाही केली जाते. दरम्यान, या वर्षी ‘तौकते’ चक्रीवादळातही झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. मात्र मुंबईत या वर्षी धोकादायक झाडांच्या छाटणीला सुरुवात झाली नसल्याने पावसाळ्यात सुरक्षा कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वृक्ष छाटणीच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने पावसाळ्यात दुर्घटना घडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्याचे निर्देश

झाडांच्या फांद्यांची छाटणी शास्त्रोक्त पद्धतीने होण्याची गरज असते. अन्यथा फांद्या तोडलेली झाडे मृत होण्याची भीती असते. त्यामुळे कंत्राटदारांनी शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी करावी असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदारांना वर्षभर निर्धारित परिसरातील  झाडांची छाटणी, संवर्धन, परीरक्षण करावे लागणार आहे.

असे होणार काम

  • धोकादायक झाडे, झाडाच्या फांद्या छाटणीसाठी तीन प्रस्तावांना दिलेल्या मंजुरीनुसार मुंबई शहरासाठी आठ पंत्राटदारांना काम देण्यात आले आहे. यासाठी पालिका 12.47 कोटींचा खर्च करणार आहे.
  • पश्चिम उपनगरासाठी नऊ कंत्राटदारांना काम देण्यात येणार असून यासाठी 16.65 कोटींचा खर्च केला जाणार आहे तर पूर्व उपनगरासाठी सहा कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी 8.87 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.