
सामना ऑनलाईन । पेइचिंग
चाइना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानात असणाऱ्या हवाई सुंदरीला विमानातच मागणी घालून तिच्या प्रियकराने तिला आश्चर्याचा धक्का दिला. ती कामावर असलेल्या विमानाने तोही प्रवास करत होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर तो अचानक तिच्यासमोर आला आणि गुडघे टेकत तिला मागणी घातली. प्रियकराच्या या आगळ्यावेगळ्या प्रकारे केलेल्या प्रपोजने भारवलेल्या प्रेयसीने तातडीने त्याला होकार दिला. प्रवाशांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, विमान कंपनीला त्यांचे हे प्रेम रुचले नसून त्यांनी या हवाई सुंदरीला नोकरीवरून काढून टाकले आहे. मात्र, खरे प्रेम मिळाल्याने नोकरी गेल्याची खंत नसल्याचे तिने सांगितले.
या दोघांच्या प्रेमाची आणि त्याने घातलेल्या मागणीचे वृत्त विमान कंपनीला समजले. कामावर असताना कर्मचाऱ्यांचे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याची गांभिर्याने दखल घेतली नाही तर असे प्रकार वाढत जातील. त्यामुळे यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे विमान कंपनीने स्पष्ट केले. अशा प्रकारांनी प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. कंपनीचा0 त्यांच्या प्रेमाला विरोध नाही. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून कारवाई करण्यात येत आहे असे कंपनीने म्हटले आहे. त्या प्रियकराने हवाई सुंदरीला घातलेल्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.





























































