नांदेडमध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळून शिवसेनेने केला दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदेड शहर व जिल्ह्यात संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त करत पाकिस्तानचा पुतळा दहन, श्रध्दांजली तसेच रक्तदान शिबीर घेवून आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेना नांदेड शाखेच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन किसवे यांच्या नेतृत्वाखाली तरोडा नाका येथे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. एक के बदले दस मारेंगे, जवानोंके लहू का बदला हम लेके रहेंगे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, उपजिल्हाप्रमुख बंडू खेडकर, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी महेश खेडकर, राजू मोरे, रवी नागरगोजे, विकास देशमुख, अमर वरगट, सतीश क्षीरसागर, विठ्ठल कल्याणकर, नरेंश दुधंबे, सतीश लांडगे, सुमीत सूर्यवंशी आदींनी यात सहभाग नोंदविला.

विश्व हिंदू परिषदेच्या नांदेड शाखेने पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करुन या हल्ल्याचा फक्त निषेध न करता पाकिस्तानला लक्षात राहील अशी लष्करी कारवाई करावी, अशी मागणीही केली. यासंबंधी प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात विहिंपचे नांदेड जिल्हाध्यक्ष नवीनभाई ठक्कर यांनी म्हंटले आहे की, आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या अमानूष हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला. आणि असह्य वेदना झाल्या. आता पाकिस्तानची आगळीक सहन करता कामा नये. त्या राष्ट्राला आयुष्यात लक्षात राहील असा धडा शिकविला पाहिजे. हिंदुस्थानच्या सैनिकांकडे कुणी बोटही दाखवू शकणार नाही, असे प्रायोजन करण्याची गरज आहे.

मुखेड-पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड येथे शहरवासियांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला. रॅलीमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. या रॅलीमध्ये शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत व्यक्ती यांनी सहभाग नोंदविला. वैद्यकीय संस्था, सुप्रभात मित्रमंडळ, मानवता विचार मंच, पत्रकार संघ आदींसह सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. रॅलीचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, मराठवाडाभूषण डॉ.दिलीप पुंडे, नामदेव जाहूरकर, उत्तम चौधरी, सचिन श्रीरामे यांनी निषेध व श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. या रॅलीस डॉ.फारुख अहमद, एम.जे.इंगोले, डॉ.पी.बी.सितानगरे, डॉ.रामराव श्रीरामे, डॉ.अशोक कौरवार, डॉ.व्यंकट सुभेदार, नंदकुमार मडगूलवार, अनिल कोत्तावार, दिलीप कोडगीरे, शिवकुमार बंडे, गणेश पाटील, बलभिम शेंडगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार तुषार राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, जिल्हा संघटक व्यंकट लोहबंदे, तालुकाप्रमुख बालाजी कबनूरकर, वसंत संबुटवाड, शहरप्रमुख नागनाथ लोखंडे यांनी निषेध व्यक्त केला.

धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने कलामंदिरजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन पुलवामा येथील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुदखेड येथे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून हा हल्ला समस्त भारतीयांच्या ह्दयावरील आघात करणारी घटना असून, ही अतिशय घृणास्पद नींदनीय घटना आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

मुदखेड शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, मुदखेड व्यापारी मित्र परिवार यांच्या वतीने पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तहसीलदारांना सचिन चंद्रे, नामदेव कहाळेकर, सुशांत भोसकर, नितीन गोडसे व अन्य यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.