
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणासाठी सुबुद्धी दे,’ असे साकडे आज सांगलीकर नागरिकांच्या वतीने आराध्य दैवत श्री गजाननाला घालण्यात आले. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने श्री गणेश मंदिरासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरतीही करण्यात आली.
सांगली, कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणात आणणे ही बाब मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याच हातात आहे. शिंदे यांनी पाठपुरावा केला, तर सिद्धरामय्या अलमट्टीतून विसर्ग वाढवू शकतात. त्यामुळे या दोघांना श्री गजाननाने सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुक्त क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, सुयोग हावळ, मोहन जामदार, नंदकुमार कापसेकर, आप्पा पाटणकर, गजानन चव्हाण, प्रमोद गायकवाड, अनिल पठाडे, शांताराम कदम उपस्थित होते.
अलमट्टीतून 1.50 लाख क्युसेकने विसर्ग
कर्नाटकातील 91.828 टीएमसी क्षमतेच्या अलमट्टी धरणात सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार 74.68 टीएमसी पाणीसाठा झाला होता. कोल्हापूर, सांगलीतून पंचगंगा व कृष्णा नदीतून अलमट्टीत 1 लाख 28 हजार 763 क्युसेक पाणी जमा होत होते, तर अलमट्टीतून 1 लाख 50 हजार 545 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत होता.