
सामना प्रतिनिधी । राहाता
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राहाता तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सावळीविहीर येथील आठवडा बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन राहाता तालुका सकल मराठा समाज नियोजन बैठकीत करण्यात आले. राहाता येथे शनिवारी तालुक्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांची नियोजन बैठक घेण्यात आली.
राज्यभरात सुरू असलेल्या सकल मराठा आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आयोजकांनी दिली. ९ ऑगस्ट रोजी राहाता तालुक्यात चक्का जाम आंदोलन कशाप्रकारे करायचे याचे नियोजन यावेळी करण्यात आले. निघोज निमगांव बायपास, हायवे चौफुली आणि निर्मळ पिंपरी बायपास येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहाता व सावळीविहीर येथे आठवडा बाजार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा आणि महविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
जक्का जाम आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. एसटी, खासगी वाहने यासह सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नये. जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, कुटूंबातील सर्वांनी रस्तावर उतरावे, शाळा बंद ठेवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र द्यावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.























































