मराठी शाळा वाचवण्यासाठी पालिकेवर मोर्चा

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मराठी शाळा जाणीवपूर्वक बंद करण्याचे कारस्थान सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत आज मराठी अभ्यास केंद्र आणि विविध संघटनांच्या माध्यमातून पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत आंदोलकांची धरपकड केली.

पालिकेच्या अंतर्गत येणाऱया विविध माध्यमाच्या 28 शाळा गेल्या तीन वर्षांत बंद पडल्या असून यात तब्बल 17 मराठी शाळांचा समावेश आहे. असे असताना आताही प्रशासनाकडून कारस्थान करून मराठी शाळा बंद पाडण्यात येत असल्याचा आरोप करीत संघटनांनी हुतात्मा स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात केली. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत ताब्यात घेत आझाद मैदानात आंदोलकांना रेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जोपर्यंत आयुक्त भेट देत नाहीत तोपर्यंत आंदोलन होत राहील असा इशारा संघटनांनी दिला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.