
सामना ऑनलाईन, नांदगाव
विद्यार्थ्यांच्या बसचा पास संपल्यानंतर त्यांना गाडीत चढू न देणे, प्रसंगी त्यांना मध्येच रस्त्यात उतरवणे, शिवीगाळ करणे, अरेरावीची भाषा करून अपमानित करणे याबाबत सातत्याने तक्रारी होऊनही एस.टी. वाहकांविरुद्धची दखल घेतली जात नसल्याने संतापलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 250 विद्यार्थ्यांनी आज थेट नांदगाव बसस्थानकावर हल्लाबोल केला. एस.टी. बसेस रोखत रास्ता रोको केल्याने खडबडून जागे झालेल्या अधिकाऱयांची चांगलीच पळापळ झाली.
विद्यार्थी पास संपल्याच्या व वाहकाच्या अरेरावीसंदर्भात प्रसंगी बसमधून खाली उतरून देण्याच्या तक्रारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे 250 विद्यार्थ्यांनी येथील बस स्थानकात जाऊन एस.टी.बससेचा मार्ग आज रोखल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱयांची एकच धावपळ उडाली.
15 सप्टेंबर रोजी नांदगाव आगारात असलेले पास संपले. तेच पास वापरा असा अनाहूत सल्ला विद्यार्थ्यांना दिला गेला. मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या वाहकांनी वेगळी वागणूक दिल्याने विद्यार्थी अपमानित व निराश झाले. आज नवीन पासशिवाय गाडीत चढू दिले जात नव्हते. म्हणून विद्यार्थी संतापले व त्यांनी थेट बस स्थानकावर जाऊन हल्लाबोल केला. तेव्हा कुठे प्रशासनास जाग आली व त्यांनी नवीन पास जारी करण्यास सुरवात करण्यात आली. रास्ता रोको केल्याने आगार प्रमुख दिलीप जाधव त्वरेने बस स्थानकावर पोहोचले. त्यांनी 15 सप्टेंबर रोजी पास संपल्याचे मान्य केले, परंतु वाहकांना या संदर्भात सांभाळून घेण्याची सूचना दिली होती अशी माहिती दिली.
आज हिसवळ येथे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘कट’ मारून बस पुढे निघून गेली. आज आमची चाचणी परीक्षा होती. काही वेळाने इंधनाची वाहतूक करणारा टँकर आला. त्यात बसून आम्ही नांदगावला आलो अशी माहिती विद्या संजय हिने दिली. काही वेळेस अर्ध्या रस्त्यामध्ये उतरवून देतात. एखाद्या वेळेस तिकीट काढायला लावतात. काहीजण शिव्या देतात. तर एकदा आम्हाला लोटून देण्यात आले. अशा वेळेस आम्ही काय करायचे असा सवाल या विद्यार्थिनी करत होत्या. सविता शिंदे हिंगणवाडी, जळगावची जगधने, वाखारीची जान्हवी ठोके आदींनी तक्रारी मांडल्या. तसेच सायंकाळी बसची वेळ सोयीची नसल्याने तास बुडवून जावे लागते. अशीही तक्रार आहे. गेल्या वर्षी बसेस वेळेवर येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार करत नांदगाव येथे शनी मंदिराजवळ विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता.























































