विधिमंडळावर पहिल्या दिवशी सहा मोर्चांची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकच नारा, शासन सेवेत कायम करा यासारख्या घोषणा देत सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समितीचा (महाराष्ट्र राज्य) मोर्चा सोमवारी विधानमंडळावर धडकला. सहा मोर्चांनी आपला आवाज बुलंद करीत मागण्या रेटून धरल्या. काहींना आश्वासन पदरी पाडून घेण्यात यश आले तर काहींना निवेदन देण्यातच समाधान मानावे लागले. कोतवाल, हिंगणघाट येथील कामगार व भंडारा जिह्यातील राजेगाव येथील नागरिकांनी आपल्या मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधले.

 केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या सर्व शिक्षा अभियान (समग्र शिक्षा) मधील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागण्या घेऊन सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती (महाराष्ट राज्य) मोर्चा विधानभवनावर धडकला. मोर्चातील मानधनावर कार्यरत कर्मचाऱयांनी आपल्या मागण्या जोरदार नारेबाजी करीत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ‘एकच नारा, शासन सेवेत कायम करा’ या घोषणा दिल्या. कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश आंबेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर, सचिव नीर ढेरे, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पोटोडे यांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले.