
बारामती येथील ‘शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय’ या वास्तूच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ 8 नामांकित लेखकांनी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’चे मार्गदर्शक पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
फेलोशिप सोडणाऱयांमध्ये लेखक नितीन रिंढे, राजीव नाईक, गणेश विसपुते, किरण येले, रणधीर शिंदे, चंद्रशेखर फणसळकर, प्रमोद मुनघाटे, शरद नावरे यांचा समावेश आहे. सध्याच्या राजकीय सत्तेला आणि त्यांच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे. त्याच पक्षाशी गौतम अदानींचे घनिष्ठ संबंध आहेत. अशा व्यक्तीला शरद पवारांनी सेंटरच्या उद्घाटनाला बोलावणे ही बाब आम्हाला खटकली. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पत्रात लेखकांनी नमूद केले आहे.

























































