PF काढताय….मग ही खबरदारी घ्या!

1553
epfo-pic

कोरोनाच्या संकटात भविष्यनिर्वाह निधीची ( Provident Fund ) रक्कम म्हणजेच पीएफ काढण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र अर्ज करताना राहिलेल्या त्रुटींमुळे अनेकदा पीएफ दावा नाकारला जात आहे. अनेकांनी याबाबत सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर पीएफसाठी ईपीएफओकडे अर्ज करताना त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी घेतलीच पाहिजे असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. अर्जदारांनी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे

बँक खात्याचा तपशील अचूक देणे
पीएफची रक्कम बँक खात्यात जमा होते. त्यामुळे ईपीएफओकडे अधिकृत नोंदणी असलेल्या बँक खात्याचा तपशील अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. बँक खात्याचा चुकीचा नंबर आढळल्यास पीएफ दावा नाकारला जाऊ शकतो. ते खाते आयएफएससी योग्य नोंदणी सह युनिव्हर्सल अकाउंट नंबर लिंक केलेले असावे. अर्जासोबत जोडला जाणारा धनादेश सुस्पष्ट असावा.

केवायसी ची पूर्तता केलेली असावी
पीएफ काढताना केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. केवायसी तपशील पूर्ण आणि पडताळणी केलेला नसेल तर ईपीएफओ आपला दावा नाकारू शकते. नोकरीचा कालावधी पाच वर्षांपेक्षा कमी असेल तर पॅन नंबर सुद्धा देणे गरजेचे आहे.

जन्मतारखेची अचूक नोंद हवी
ईपीएफओकडे नोंद असलेली जन्मतारीख आणि कंपनीने नोंदवलेली जन्मतारीख मिळतीजुळती नसल्यास पीएफचा दावा फेटाळला जाऊ शकतो. ईपीएफओने अलीकडेच जन्मतारखेची अचूक नोंद करण्यासाठी तसेच युएएन आणि आधार लिंक करण्यासाठी नियमावली थोडी शिथील केली आहे,अर्जदारांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

आधार आणि युएएन लिंक गरजेची
पीएफ काढण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी आधार आणि युएएन यांची लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक नसेल तर कोरोना इमर्जन्सीतही पीएफचा दावा नामंजूर केला जाऊ शकतो. यूएएन किंवा पीएफ अकाउंट आधारला चार पद्धतीने जोडले जाऊ शकते असेही जाणकारांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या