
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत आता २०१९ सालापासून शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य असणार आहे. तसेच मुलांवरील अभ्याक्रमाचा बोजा कमी करण्यासाठी यामध्ये ५० टक्के कात्री लावण्यातही येणार आहे.
यावेळी राजवर्धनसिंग राठोड पुढे म्हणाले, २०२२ सालापर्यंत साई (स्पोर्टस् इंडिया) येथील ५० टक्के कर्मचार्यांमध्ये कपात करण्यात येणार असून त्यामुळे पैशांची बचत होईल आणि खेळांच्या विकासासाठी त्याचा वापर करण्यात येईल. रग्बी या खेळाची वर्ल्ड कप ट्रॉफी हिंदुस्थानात आणली असून या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
प्रत्येक शाळेमध्ये दोन ते तीन खेळांवर लक्ष
या वर्षी खेळ हा अविभाज्य घटक असलेल्या २० शाळा केंद्राकडे असणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेला सात ते दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेत दोन ते तीन खेळ अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे विशिष्ट खेळावर लक्ष केंद्रित करता येईल, असे राजवर्धनसिंग राठोड यांनी आवर्जून सांगितले.






























































