पं. रघुनंदन पणशीकर देणार स्वराभ्यासाचा मंत्र, ‘स्वर समर्पण’ कार्यशाळा; शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी

शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक आणि कानसेनांसाठी विशेष संधी चालून आली आहे. मुंबईत येत्या 10 ऑगस्ट रोजी ‘स्वर समर्पण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रख्यात शास्त्रीय गायक व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर या कार्यशाळेत स्वराभ्यासाचा मंत्र देणार आहेत. शास्त्रीय संगीतातील बारकावे उलगडून दाखवणार आहेत.

वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यशाळेचे आयोजन ग्लिटरेटी म्युझिक अॅकॅडमीने केले आहे. कार्यशाळेत पं. पणशीकर हे विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि सुगम संगीतासाठी आवश्यक असलेला स्वराभ्यास, स्वर विस्तार, स्वरांची लवचिकता, ख्याल संगीतामधील रचनात्मक तंत्र, गायनासाठी लागणारा दमसास, पारंपरिक बंदिशींमधील सौंदर्य यावर सखोल मार्गदर्शन करतील. यासोबतच पं. पणशीकर यांच्या सोबत प्रश्नोत्तराचे सत्र देखील होईल. या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान 3 ते 4 वर्षे गायन शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी पराग खोत (9769201099) यांच्याशी संपर्क साधावा.