
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
ऑनलाईन गेम्सचं व्यसन तरुणांमध्ये वाढत चाललं आहे. हे रोखण्यासाठी गुजरातमध्ये पबजी सारख्या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरुणाई वेगवेगळ्या मार्गांनी हे खेळ डाऊनलोडकरून खेळत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात 10 जणांच्या अटकेनंतर आता आणखी तीन जणांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्या तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
14 मार्च रोजी अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून पबजीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली होती. असे असताना देखील गुजरातच्या विविध शहरांमध्ये काही जण हे पबजी गेम खेळत असल्याचे पोलिसांना सॅटेलाइटच्या माध्यमातून कळाले. निश्चित ठिकाणांवर धाड टाकत पोलिसांनी तिघांना अटक केली. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तिघांवर 188 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.


























































