विमान प्रवाशांची सुरक्षा, भाडेवाढीवरून लोकलेखा समितीच्या बैठकीत हंगामा

अहमदाबादमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा, पहलगाम हल्ल्यानंतर आणि महाकुंभदरम्यान करण्यात आलेली भाडेवाढ, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड अशा विविध मुद्द्य़ांवरून आज लोकलेखा समितीच्या बैठकीत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षांनी डीसीजीए अर्थात नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आणि प्रश्नांची उत्तरे मागितली. यावर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी चूक कबूल केली. तसेच भाडेवाढ कमी करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याचे आणि सुरक्षेच्या मुद्द्य़ावर यंत्रणा उभारण्याचे आश्वासन लोकलेखा समितीला दिले.

डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान जुनेच सादरीकरण केले. त्यामुळे विरोधी पक्षाचे खासदार प्रचंड संतापले. एअर इंडियाची झालेली दारुण आर्थिक अवस्था, अलीकडेच झालेले विमान अपघात, तांत्रिक बिघाड आणि उड्डाणांमध्ये होत असलेला विलंब अशा विविध मुद्दय़ांवरून खासदारांनी डीजीसीएच्या अधिकाऱयांना धारेवर धरले.

लोकलेखा समितीच्या सदस्यांनी डीजीसीएच्या अधिकाऱयांना अनेक सवाल केले. अहमदाबाद विमान अपघात कसा घडला, ब्लॅक बॉक्सचे काय झाले, तपास अहवाल कधीपर्यंत येणार, असे अनेक प्रश्न विचारले. बैठकीला एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन कॅम्पबेल यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. नागरी उड्डाण मंत्रालय, डीजीसीए, एएआय, बीसीएएसचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सच्या अधिकाऱयांनाही बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमानाचे प्रवास भाडे वाढवण्यावरून खासदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सुरक्षेच्या मुद्दय़ावरून प्रत्येकजण चिंताग्रस्त आहेत. भाडेवाढीबद्दलही विमान पंपन्यांना नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती लोकलेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल यांनी दिली.

अहमदाबाद दुर्घटनेवरून धारेवर धरले
एअर इंडियाच्या एआय 171 या विमानाला अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला. खासदारांनी या अपघाताच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीबाबतही सवाल केले. या तपासात एखाद्या परदेशी तज्ञ कमिटीची मदत घेण्यात आली आहे का किंवा कुणी स्वेच्छेने या तपासात सहभागी झाले आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटाचे विश्लेषण कधीपर्यंत पूर्ण होणार, अहवाल कधी येणार, त्यासाठी डेडलाईन देण्यात आली आहे का? असे अनेक सवाल खासदारांनी अधिकाऱयांना केले.

एअर इंडिया म्हणाले ड्रीमलायनर सुरक्षित
अहमदाबाद अपघातप्रकरणी एअर इंडियाने लोकलेखा समितीला अहवाल सोपवला. ड्रीमलायनर सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. जगभरात याची हजारांहून अधिक विमाने आहेत. अहमदाबाद येथे ड्रीमलायनर विमानाचाच अपघात झाला होता. असे असतानाही ही विमाने सर्वात सुरक्षित असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आल्यानंतर खासदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली.