अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात तारापूरवासीयांच्या संतापाचा भडका

सामना प्रतिनिधी । बोईसर

भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसून परप्रांतीयांना नोकऱ्यांची दारे ‘सताड’ उघडी करणाऱ्या येथील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पालघरवासीयांच्या संतापाचा आज भडका उडाला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सकाळी ६.३० वाजता हजारो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कंपनीच्या बसेसवर तुफान दगडफेक करीत येण्या-जाण्याचे मार्ग रोखून धरले. परप्रांतीयांची भरती रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही असे सांगत गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुरती कोंडी झालेले अणुऊर्जा आयोगाचे प्रशासन सपशेल शरण आले आणि त्यांनी नव्या भरतीला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.

तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाचे एकूण चार युनिट्स आहेत. या प्रकल्पात टेशियन आणि सायंटिफिक ऑफिसर अशी एकूण २०० जणांची भरती करण्यात येणार होती. त्यासाठी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या मार्फत एक परीक्षा घेण्यात आली. स्थानिक तरुणांनी मोठ्य़ा प्रमाणावर ही परीक्षा दिली होती. मात्र निकालात फक्त एका स्थानिक तरुणाला पास करून उर्वरित ५४ जागांवर परप्रांतीयांची वर्णी लावण्यात आली. या अन्यायाविरोधात आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र थेट रस्त्यावर उतरले. शिवसेनेचे आमदार अमित घोडा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, पंचायत समिती सदस्य सुशील चुरी, राजेंद्र मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.

एकजुटीचा विजय.. भरती प्रक्रिया रद्द
शिवसेनेसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी चर्चेला बोलावले. या बैठकीला चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एस.के. शर्मा, स्टेशन डायरेक्टर व्ही. एस. डॅनिअल, देसनवी, क्वालिटी इन्शुरन्स सुप्रिटेंडंड ए. पी. कुलकर्णी, सिनिअर मॅनेजर (एचआर) पी. एम. पांड्य़ा उपस्थित होते. या अणुऊर्जा प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी आपल्या कसत्या जमिनी आणि राहत्या घरांचा बळी दिला आहे. त्यामुळे येथील नोकऱ्यांवर त्यांचाच अधिकार आहे असे आमदार अमित घोडा, जिल्हाप्रमुख राजेश शहा आणि वसंत चव्हाण यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. जोपर्यंत ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही तोपर्यंत ठिय्या उठणार नाही असे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांची दिल्लीपासून फोनाफोनी सुरू झाली. ग्रामस्थांच्या एकजुटीचा अखेर विजय झाला. या भरती प्रक्रियेलाच स्थगिती देत असल्याचे एस. के. शर्मा यांनी जाहीर केले.

पोलिसी बळालाही गावकरी बधले नाहीत
मॉर्निंग शिफ्टसाठी येणाऱ्या कंपनीच्या बसेस पाच मार्गावरच रोखून धरल्या आणि दगडफेक करून गाड्य़ांची तोडफोड केली, टायर पंक्चर केले. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प अधिकारी, कर्मचाऱयांची प्रचंड घबराट उडाली. नाईट शिफ्टचे कर्मचारी कंपनीतच अडकून पडले. कंपनी प्रशासनाने पोलिसी बळाचा वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी डगमगले नाहीत. जोपर्यंत या भरतीला स्थगिती देत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असे त्यांनी ठणकावले. त्यामुळे कंपनी प्रशासनाची तंतरली.