कर्करोग रुग्णालयांसाठी 13 हजार 500 कोटी रुपये, आरोग्य मंत्र्यांची घोषणा; शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, रासायनिक फळभाज्यांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात तीन स्तरांवर कर्करोग उपचार रुग्णालय सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 हजार 500 कोटी रुपये दिल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत केली.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्करोगावरील उपचारांसाठी देश व राज्यातून रुग्ण मुंबई टाटा रुग्णालयात उपचारांसाठी येतात. तेथे पेशंट जास्त व वॉर्ड कमी आहे. टाटावरील भार कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय रुग्णालये करा व मुंबईसह दोन्ही उपनगरात कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी केली. या लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लेव्हल 1, 2 व लेव्हल 3 अशा तीन प्रकारच्या रुग्णालयांची उभारणी राज्य सरकार करीत आहे. लेव्हल 1 मध्ये टाटा रुग्णालय, लेव्हल 2 मध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईत जे. जे. रुग्णालय, कोल्हापूर नांदेड या ठिकाणी तसेच नाशिक, अमरावतीमध्ये विभागीय रुग्णालयात व लेव्हल 3 वर अंबेजागाई, यवतमाळ, मुंबईतील कामा रुग्णालय, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थानचे रुग्णालय या रुग्णालयांत उपचार सुरू करणार आहोत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केमोथेरेपीसाठी 26 डे केअर सेंटरसाठी मान्यता दिली आहे. 9 ते 13 वयोगटातील मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक लस शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत वाढते प्रमाण

मुंबई शहर हे फुप्फुसाच्या कर्करोगाचे हॉटस्पॉट झाले आहे. शहरातील विषारी हवेमुळे अनेकजण याला बळी पडत आहे. मुख, गर्भाशय व स्तनाच्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याबद्दल सुनील प्रभूंनी चिंता व्यक्त केली.