स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक विहिरींची हेळसांड

24

सामना प्रतिनिधी । हडोळती

कधी काळी गावचे वैभव असलेल्या ग्रामीण भागातील सार्वजनिक विहीरीं(आड)ची आज दुरावस्था झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील या विहीरींची पडझड व या विहीरींच्या भोवती झाडे झुडपे वाढल्यामुळे गाळ उपसून कचरा काढून या विहीरीला कठडे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा या दुष्काळी परिस्थीतीत पिण्याच्या पाण्याचे हे शाश्वत स्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

हडोळती येथील गावची लोकसंख्या जवळ जवळ १५००० ते १६००० च्या दरम्यान असून येथे ९ सार्वजनिक विहीरीची संख्या आहे. परंतु ५ सार्वजनिक विहीरीच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु त्यामधील कांही विहीरींना कठडे नसल्यामुळे पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना कसरत करून पाणी उपसा करावा लागतो. काही विहीरी या झाडे झुडपांनी व्यापून गेल्याने स्वातंत्र्य पूर्व काळातील या विहीरींचे प्रशासनाला अस्तित्व सुद्धा टिकवता येत नसल्यामुळे लोकप्रतिनीधींचे व प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. कांही वस्त्यांमध्ये या विहीरींच्या पाण्याचा वापर धुणे, भांडी आदी उपयोगासाठी केला जातो. यावर्षी दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे याचा पिण्यासाठीही वापर केला जात आहे. परंतु वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ज्या विहीरींचा वापर आहे त्या विहीरींच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे.

या विहिरींचे पाणी दूषित होऊ नये याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहीजे व ज्या विहीरींची पडझड झालेली आहे त्या विहीरींची दुरुस्ती, आजूबाजूची झाडे झुडपे, विहीरींचा उपसा, विहीरीतील गाळ काढणे गरजेचे आहे. विहीरींना कठडे बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थितीला आळा बसेल, अशी मागणी येथील नागरीक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या